'बाइक अँब्युलन्स'ने 232 रुग्णांवर उपचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई - आरोग्य विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवआरोग्य बाइक अँब्युलन्सच्या मदतीने महिनाभरात 232 रुग्णांना आपत्कालीन आरोग्यसेवा देण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. 2 ऑगस्टला बाइक अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली. तिला मुंबईत सामान्य नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या 232 रुग्णांपैकी प्रामुख्याने 32 बेशुद्ध रुग्णांना वेळेवर उपचार करण्यात आले. तापाचे 16, श्वास घेण्यात अडचण येत असलेले 25 रुग्ण, हृदयविकाराचा त्रास जाणवणाऱ्या 24, तर पोटदुखीच्या 14 रुग्णांना वेळीच बाइक अँब्युलन्सच्या मदतीने उपचार देण्यात आले. चारकोप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 40, गोरेगाव फिल्मसिटी भागातून 37, चिता कॅम्प भागातून 30, अशोक टेकडी भागातून 26, नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 24 अशाप्रकारे 232 रुग्णांना सेवा देण्यात आली. मुंबईतील 10 ठिकाणी या बाइक अँब्युलन्स आहेत.