कनिष्ठ न्यायालयातील खटल्याला तात्पुरती स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील आदेश मिळेपर्यंत अभिनेत्री जिया खान आत्महत्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेला खटला थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. राज्य सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआयने यास आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सीबीआयच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयात या खटल्याची सुनावणी घेऊ नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. 

जिया खानने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली होती. तिचा प्रियकर अभिनेता सूरज आदित्य पांचोलीवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस आणि सीबीआय करत आहेत. त्यामुळे सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात राज्य सरकार विशेष सरकारी वकील नेमू शकतात का, यावर निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, असे मत उच्च न्यायालयाचे न्या. ए. के. मेनन यांनी व्यक्त केले. कनिष्ठ न्यायालयातील सुनावणीत सीबीआयच्या वकिलांना युक्तिवाद करण्यास मनाई केली जाते, या प्रकरणी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती होईपर्यंत युक्तिवाद करू नये, असे सांगण्यात येत असल्याचे सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. जिया खान यांची आई राबिया खान यांनी सीबीआयच्या तपासाविरोधात केलेल्या याचिकेवर राबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचीच विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केली असल्याची बाबही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून सीबीआयवर दबाव टाकला जाऊ शकतो का? असा प्रश्‍न न्या. मेनन यांनी विचारला, त्यामुळे महाधिवक्‍त्यांनी याप्रश्‍नी पुढील सुनावणीत खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.