आर्थर रोड तुरुंगातील 86 कैदी देताहेत परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

मुंबई - आर्थर रोड तुरुंगातील 86 कैदी यंदा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची परीक्षा देत आहेत. या तुरुंगात बुधवारपासून सुरू झालेली ही परीक्षा महिनाभर सुरू राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अनेक जण गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांना लवकरच जामीन मिळणे कठीण असते. अशांना तुरुंगातील कालावधीचा सदुपयोग करून बारावी आणि त्यापुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुरुंग अधिकारी व कर्मचारी प्रोत्साहीत करतात. त्यामुळे 86 कैद्यांनी मुक्त विद्यापीठाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यात वाणिज्य, कला शाखेसह इतर अभ्यासक्रम आहेत. प्रयोगशाळा नसल्याने विज्ञान शाखेसाठी तुरुंगात परीक्षा घेण्यात आलेली नाही. आर्थर रोड तुरुंगासह ठाणे, तळोजा व इतर तुरुंगींतील कैदीही ही परीक्षा देत आहेत. गतवर्षी 90 कैद्यांनी परीक्षा दिली होती. आर्थर रोड तुरुंगाची 800 कैद्यांची क्षमता आहे. मात्र सध्या येथे 2500 कैदी आहेत.