एकनाथ खडसेंच्या भाच्याला 15 डिसेंबरपर्यंत कोठडी 

एकनाथ खडसेंच्या भाच्याला 15 डिसेंबरपर्यंत कोठडी 

नवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे-बिंद्रे बेपत्ता प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला कळंबोली पोलिसांनी अटक केली. आज पनवेल न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अश्‍विनी बेपत्ता झाली त्याच दिवशी राजेश आणि आरोपी अभय कुरुंदकर यांचे फोनवर संभाषण झाले, त्यामुळे राजेशचा या प्रकरणाशी संबंध आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला. 

अश्‍विनी 11 एप्रिल 2016 ला बेपत्ता झाल्या. त्यादिवशी कुरुंदकर, अश्‍विनी बिंद्रे आणि राजेश यांचे मोबाईल लोकेशन भाईंदरमध्ये एकाच ठिकाणी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी राजेशशी संपर्क करून खातरजमा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी दोन दिवस केलेल्या चर्चेत राजेश याने तपासात सहकार्य न केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच, ज्यादिवशी अश्‍विनी बेपत्ता झाल्या त्यादिवशी राजेश जळगावहून अंधेरी येथे आला होता. यादरम्यान कुरुंदकरचे राजेशशी फोनवरून सतत संभाषण सुरू होते. नंतर राजेश अंधेरीहून दीड तास प्रवास करून भाईंदर येथे कुरुंदकर भाड्याने राहत असलेल्या घरी गेला. त्या वेळी राजेश आणि कुरुंदकर यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाल्यावर राजेश निघून गेला. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपास करायचा आहे, त्यासाठी कुरुंदकर आणि राजेश यांची एकत्रित चौकशी करण्याची गरज आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यांच्या मागणीनुसार न्यायालयाने राजेशला चार दिवसांची कोठडी सुनावली. 

केवळ मोबाईल लोकेशन एकच असल्याच्या मुद्द्यावर राजेशला अटक करणे योग्य नाही, अशी भूमिका आरोपी पक्षाचे वकील देवेंद्र पाटेकर यांनी न्यायालयात मांडली. कुरुंदकर आणि राजेश यांची एकत्रित चौकशी करायची असून या प्रकरणात राजेश पाटील यांचा नक्की काहीतरी संबंध आहे, असा संशय सहायक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर यांनी व्यक्त केला. 

कोण आहे राजेश पाटील? 
राजेश पाटील हा भुसावळ तालुका भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे. बांधकाम, बांधकामाचे साहित्य पुरवणे, इलेक्‍ट्रिक फिटिंगची सरकारी कामे आदी व्यवसाय तो करतो. यात अनेक बड्या व्यक्तींसोबत त्याची भागीदारी असल्याचे सूत्रांनी सांगितले. अश्‍विनी बेपत्ता प्रकरणात नवी मुंबई पोलिसांचे अटकेचे पुढील टार्गेट जळगावातील उपद्रवी वाळू व्यावसायिकही असू शकतात, अशी माहितीही हाती आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com