जैवविविधता समिती कागदावरच!

Mumbai-Municipal
Mumbai-Municipal

मुंबई - मुंबईसाठी जैवविविध समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव ऑगस्ट 2017 पासून महापालिकेच्या महासभेत प्रलंबित आहे; मात्र अद्याप या समितीचे सदस्य नियुक्त झालेले नाहीत. शहरातील जैवविविधतेची नोंद ठेवून त्याचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही समिती करणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सर्व शहरांमधील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. मुंबईत महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तयार होणाऱ्या या समितीत सात नगरसेवकांचाही समावेश करण्यात येणार होता. या नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी प्रशासनाने महासभेत ऑगस्टमध्ये प्रस्ताव मांडला होता; मात्र अद्याप राजकीय पक्षांकडून या समितीच्या सदस्यपदासाठी नगरसेवकांची नावे सुचवण्यात आलेली नाहीत.

गोरेगावमधील आरे वसाहतीतील मेट्रो रेल्वेची प्रस्तावित कारशेड आणि मेट्रोसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला शिवसेना विरोध करत आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे ट्‌विटरवरून मुंबईचे पर्यावरण जपण्याचा सल्ला देत आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातही शिवसेना आणि कॉंग्रेसने मेट्रोसाठी झाडे कापण्यास विरोध केला; मात्र सत्ताधारी शिवसेना सहा महिन्यांपासून शहराची जैवविविध समिती नियुक्त करू शकलेली नाही.

...तर संशोधनाला चालना
सरकारी प्रकल्पांसाठी मुंबईतील जैवविविधतेचा सरकारी पातळीवरच अभ्यास केला जातो; मात्र या वेळी पहिल्यांदाच जैवविविधता जपण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यातून संशोधनालाही चालना मिळू शकते. मुंबईतील 65 ते 70 टक्के क्षेत्रफळावर बांधकामे उभी राहिली आहेत; मात्र समुद्र, खाडी किनारे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोरेगाव येथील आरे वसाहत, मलबार हिल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता असण्याची शक्‍यता आहे. आरे वसाहतीत काही संशोधकांना कोळ्याच्या दुर्मीळ जाती आढळल्या; मात्र संशोधन होत नसल्याने जैवविविधता दुर्लक्षितच राहिली.

आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींची विशेष नोंद जैवविविधतेच्या अहवालात केली जाणार आहे. तसेच अभ्यास आणि संशोधनासाठीही संधी मिळणार आहे. त्याकरिता शुल्कही आकारले जाऊ शकते.

अशी असेल समिती
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अध्यक्ष, उद्यान अधीक्षक सचिव, सात नगरसेवक, प्राणिसंग्रहालय, जनसंपर्क, आरोग्य, जलअभियंता, पर्यावरण या विभागाचे प्रमुख, कृषी, पर्यावरण, मत्स्य, पशुपक्षी, आरोग्य, वन या क्षेत्रांतील तज्ज्ञांसह मुंबई विद्यापीठातील तज्ज्ञांचा समावेश असेल. तसेच एक आमदार आणि एक खासदार मानद सदस्य असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com