नवी मुंबईत होणार सीसी टीव्हींचे सर्वेक्षण

शेखर हंप्रस
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कोपरखैरणे - वाशी दरोड्यातील आरोपींना पकडण्यात सीसी टीव्ही फुटेजचा महत्त्वाचा वाटा असल्याने नवी मुंबई पोलिसांनी आता शहरातील सीसी टीव्हींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शहरात किती इमारती व किती इमारतींमध्ये सीसी टीव्ही आहेत याची नोंद करण्यात येणार आहे.

कोपरखैरणे - वाशी दरोड्यातील आरोपींना पकडण्यात सीसी टीव्ही फुटेजचा महत्त्वाचा वाटा असल्याने नवी मुंबई पोलिसांनी आता शहरातील सीसी टीव्हींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शहरात किती इमारती व किती इमारतींमध्ये सीसी टीव्ही आहेत याची नोंद करण्यात येणार आहे.

वाशीतील दरोड्याची उकल करण्यात पोलिसांनी जिवाचे रान केले, परंतु यात त्यांना मोलाची मदत झाली ती सीसी टीव्ही फुटेजची. दरोडेखोरांचे त्यात चित्रीकरण झाल्याने त्यांची ओळख पटवणे पोलिसांना सहज शक्‍य झाले. यामुळे सीसी टीव्हीचे महत्त्व पुन्हा सिद्ध झाले. वाशी सेक्‍टर १७ येथील कुसुम इमारतीमधील अरुण मेनकुदळे यांच्या घरावर भरदिवसा दरोडा पडला होता. त्यात दोन कोटींपेक्षा जास्त किमतीचा ऐवज लंपास झाला होता. मेनकुदळे यांच्या घरासमोरील सदनिकाधारकाच्या चौकटीवर सीसी टीव्ही कॅमेरा होता. त्यामुळे या गुन्ह्याची उकल करणे सोपे झाले. तेव्हा याचे महत्त्व लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरातील सोसायट्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ज्या सोसायट्यांमध्ये सीसी टीव्ही नाहीत, तेथील रहिवाशांना त्याचे महत्त्व पटवून देणार आहेत.

दीडशेहून अधिक गुन्ह्यांत मदत
नवी मुंबईत यापूर्वीही वाशी सेक्‍टर १६ येथील चितोडगड इमारतीतील दरोडा व हत्या, सेक्‍टर ९ येथील महिलेच्या गळ्यातील साखळीचोरी अशा आतापर्यंतच्या १५० हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात सीसी टीव्हीची पोलिसांना मदत झालेली आहे.

आम्ही ढोबळ आढावा घेतला असता अनेक गुन्ह्यांत सीसी टीव्हीची मोलाची मदत झाली आहे. मोठे शोरूम, दुकाने, ज्वेलर्स या ठिकाणी बऱ्यापैकी सीसी टीव्ही आहेत; मात्र अनेक उच्चभ्रू, मध्यम व चाळ टाईप सोसायट्यांत नाहीत. याचे सर्वेक्षण आम्ही करणार आहोत. त्यात बंद सीसी टीव्हीची दुरुस्ती व जेथे ते नाहीत त्यांना ते बसवण्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे.
- तुषार दोषी, उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: mumbai news CCTV survey