'राजधानी'मध्ये सीसीटीव्हीची नजर

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबई-दिल्लीदरम्यान धावणाऱ्या राजधानी तसेच ऑगस्ट क्रांती एक्‍स्प्रेसमध्ये चोऱ्या होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर या गाड्यांच्या प्रत्येक डब्यात एक किंवा अधिक सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए .के. गुप्ता यांनी दिली. चर्चगेट ते पालघरपर्यंतच्या स्थानकांत दोन हजार 600 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना असल्याचेही ते म्हणाले.

"राजधानी', "ऑगस्ट क्रांती'मधील वाढत्या चोऱ्यांच्या प्रकारांमुळे पश्‍चिम रेल्वेच्या व्यवस्थापनाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. या चोऱ्या कशा, कोणत्या स्थानकांदरम्यान, कोणत्या वेळेत होतात याबाबत अभ्यास करण्याच्या सूचनाही गुप्ता यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे चोऱ्या रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल दहशतवाद्यांच्या नेहमीच "हिटलिस्ट'वर असते. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने सर्व स्थानकांची नुकतीच संयुक्त पाहणी केली. त्यानंतर चर्चगेट ते पालघरच्या स्थानकांदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णयही पश्‍चिम रेल्वेच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.

सीआरसीएफच्या आधुनकीकरणासाठी साकडे
लोकल-एक्‍स्प्रेसमधील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांची संख्या वाढलेली नाही. या दलाकडे उपलब्ध साधनसामग्रीही मर्यादित आहे. या दलाकडे बॅग स्कॅनरही नाही, या पार्श्‍वभूमीवर "आरसीएफ'चे आधुनकीकरण करण्याची मागणी रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त उदय शुक्‍ला यांनी गुप्ता यांच्याकडे केली आहे. आरसीएफच्या जवानांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी एखादे केंद्र असावे, या जवानांना परेडसाठी मैदान उपलब्ध नाही. त्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या जवानांच्या घरांच्या प्रश्‍नांबाबत रेल्वे मंडळाशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

Web Title: mumbai news cctv watch in rajdhani express