थ्री इडियट्‌स बना!

थ्री इडियट्‌स बना!

मुंबई - तुम्ही आयुष्यात तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा; मात्र आपल्याला जे काही करायचे आहे ते तुम्हाला आधी कळायला हवे. तुमचे निश्‍चित ठरले की पालकांना सांगा. वाट चुकली असे वाटले तर जरूर बदला, पण तो निर्णय तुम्ही घ्या. उगाच कोणाचेही ऐकून काहीही ठरवू नका, असा थ्री इडियट्‌सच्या वाटेने जाणारा कानमंत्र अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर याने शाळकरी मुलांना दिला. मुलांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली.

‘सकाळ’च्या ज्युनिअर लीडर स्पर्धेनिमित्त गोरेगाव पूर्वेकडील हरणाई विद्यालय आणि गुरुकुल शिक्षण प्रसारक मंडळात तसेच निवारा विद्यालयात सोमवारी (ता. १७) हजेरी लावली. या वेळी चिन्मयचे औक्षण करून लेझीमच्या तालावर शाळांकडून स्वागत करण्यात आले. त्या वेळी आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या चिन्मयदादाला पाहून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. चिन्मयबरोबर गप्पा मारताना त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. हशा, टाळ्यांच्या गजरात या चिमुकल्यांनी त्याला धीटपणे प्रश्‍नही विचारले. 

मला शाळेत असताना झोप यायची. मी नववीपर्यंत फारसा हुशार नव्हतो, असे चिन्मयने सांगितल्यावर, मुले अजूनच धीट झाली. कोणाचा पहिला नंबर आला नाही म्हणजे त्याला डोके नाही, असे नाही. कोणाचे डोके चित्रकलेत तर कोणाचे गाण्यात चालते, कोणाचे अभिनयात, कोणाचे नाटक लिहिण्यात चालते, हे सांगताना त्याने स्वतःचेच उदाहरण दिले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या दहा हजार अर्जदारांमधून निवड झालेल्या २० जणांमध्ये महाराष्ट्रातून मी एकमेव होतो. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला तेव्हा मी टॉपर होतो, असे त्याने सांगितले. मासा गुणी आहे का, हे पाहण्यासाठी त्याची उडण्याची क्षमता तपासू नका, तर त्याची पोहण्याची क्षमता पाहा, असे आईनस्टाईन यांनी सांगितल्याचा दाखलाही चिन्मयने दिला. 

तुमच्या मनाला जे वाटेल ते करा. कशातही करिअर करा. नववीत असतानाच पुढे काय करायचे, हे ठरवा व दहावीत त्या दिशेने पावले टाका. काय करायचे ते आई-वडिलांना, शिक्षकांना सांगा. दहावीनंतर जी वाट ठरवाल तीच पकडा. वाट चुकली, जमत नाही तर जरूर वाट बदला. एखादा निर्णय चुकू शकतो; पण काय ते तुम्हीच ठरवा, असेही चिन्मयने सांगितले.

‘सकाळ’चा ज्युनियर लीडर हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांनी भाग घ्यावा. 
- राजेंद्र कालेकर, मुख्याध्यापक, गुरुकुल शिक्षण संस्था

‘सकाळ’च्या या उपक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. त्यामुळे ‘सकाळ’च्या सर्व उपक्रमांमध्ये शाळा सहभागी होते. यापुढेही ‘सकाळ’च्या उपक्रमांना शाळेचा असाच पाठिंबा राहील. 
- बाळकृष्ण हळदणकर,  विश्‍वस्त, निवारा विद्यालय

तुमचे राज्य स्थापन करा
शिवरायांचे वडील शहाजीराजे हे बहुसंख्य वर्षे सुलतानांचे मातब्बर सरदार होते; मात्र शिवाजीराजांनीही तसाच विचार केला असता, तर हिंदवी स्वराज्य झालेच नसते; पण मला माझे स्वराज्य हवे आहे, असे शिवरायांनी म्हटल्यामुळे पुढचा इतिहास घडला. तुम्हालाही तुमचे राज्य स्थापन करायचे आहे, हे विसरू नका.

मी का शिकावे?
मी बीजगणित का शिकावे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय हे भाजीवाली मला कधीच विचारत नाही; मग मी हे का शिकावे, असे मला वाटत असे; पण आज मी शिकलो म्हणून तुमच्यासमोर उभा आहे.  

मी घरातला टीव्ही काढून टाकला
तुम्ही कार्टून बघता का, मोबाईलवर गेम कोण खेळत, कोणते कार्टून आवडते, आईबाबांना उलट उत्तरे देणारा शिंगचॅंग तुम्हाला का आवडतो, असे प्रश्‍न विचारत चिन्मयदादाने मुलांची फिरकी घेतली. टीव्ही, इंटरनेट यांचा उपयोग चांगल्या कामांसाठी करा. यू ट्यूबवर अभ्यासाची माहिती मिळते, असा सल्लाही त्याने दिला. माझी मुलगी सर्व सिरिअल बघायची. त्यामुळे मी घरातून टीव्ही काढून टाकला, असे त्याने सांगताच मुलांमध्ये एकच हशा पिकला.  

परीस नसतोच, मेहनतच खरी
लोखंडाचे सोने करणारा परीस असा नसतोच; पण लोखंडाचे सोने करायची ताकद आपल्या हातात असते, डोके चालवायची ताकद सगळ्यांनाच देवाने दिली आहे. सचिन तेंडुलकर आता श्रीमंत असला, तरी तो पूर्वी चाळीत राहात असे. त्याचे तसे शिक्षण कमी असले, तरी तो आता भारतरत्न आहे.

उन्हात पाय भाजतात...
कोणत्याही क्षेत्रात मेहनत करावीच लागते. आताही कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत तुकारामाची भूमिका करताना उन्हात पाय भाजतात; पण इलाज नसतो. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श असून माझ्या मनात त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे. मी देव मानतो; पण बाकी कोणीही बुवा-बाबा किंवा राजकारण्यांना मानत नाही, असेही चिन्मय मांडलेकरने सांगितले. 

‘सकाळ’चे अभिनंदन
विद्यार्थी घडवणारे चांगले समाजाभिमुख उपक्रम राबविल्याबद्दल मंडळाच्या सचिव मंगला रसाळ यांनी ‘सकाळ’चे आभार मानले. शाळा नेहमीच अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेते. अशा उपक्रमांमधूनच मुले घडतात. कोणत्याही क्षेत्रात अगदी श्रमिकांच्या कामातही कष्टाला पर्याय नाही, हे मुलांनी लक्षात ठेवावे, तरच देव यश देतो, असे त्या म्हणाल्या. हरणाई विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव अण्णा पवार व गुरुकुलच्या प्राथमिकचे अशोक तोसकर यांनीही ‘सकाळ’च्या उपक्रमाचे कौतूक केले. निवारा विद्यालयाचे सदस्य श्रीधर महाडेश्‍वर, मुख्याध्यापिका समीक्षा साळसकर यांनीही या स्पर्धेत सहभागी होण्यास मुलांना सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत माईणकर, शिल्पा दळी यांनी प्रयत्न केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com