'त्या' विद्यापीठांतही गोंधळ सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

दुसऱ्याच विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्याची प्राध्यापकांवर सक्ती

दुसऱ्याच विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्याची प्राध्यापकांवर सक्ती
मुंबई - मुंबई विद्यापीठामध्ये सुरू असलेला उत्तरपत्रिका तपासणीचा गोंधळ मदत घेतलेल्या इतर विद्यापीठांतही सुरू झाला आहे. एका विषयाची उत्तरपत्रिका दुसऱ्याच विषयाच्या प्राध्यापकांकडे तपासण्यास देण्यात येत आहेत. आधीच अभ्यासक्रम वेगळा असल्याने त्यांना अडचणी येत असताना ही जबरदस्ती करण्यात येत आहे. या गोंधळाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार असून, गुणवत्ता कमीच राहण्याची भीती प्राध्यापकांमधून व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी नागपूर, पुणे, कोल्हापूर व पुणे विद्यापीठांना मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्यात आल्या होत्या. एक तर या विद्यापीठातील प्राध्यापकांना ऑनस्क्रीन असेसमेंटचे प्रशिक्षण दिलेले नाही. या गोंधळातच विद्यापीठांत उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू आहे. शनिवारी औरंगाबाद विद्यापीठात बिझनेस लॉ विषयाची उत्तरपत्रिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाला मिळाली. मात्र, याविषयीची वाच्यता न करण्याची सक्त ताकीद वरिष्ठांकडून देण्यात आली. या प्राध्यापकाने नाईलाजाने बिझनेस लॉचा पेपर तपासला; परंतु त्याविषयीची माहिती मुंबईतील परिचित प्राध्यापकांना दिली. ही जबरदस्ती मुंबईबाहेरील प्राध्यापकांसोबतही होत असल्याने मुंबईबाहेर तपासल्या गेलेल्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी प्राधान्यक्रमाने केली जावी, अशी मागणी होत आहे.

मुंबईत आता इतिहास, समाजशास्त्र या विषयांसह आयडॉलमधील काही विषयांची हातानेच तपासणी सुरू आहे. आज मध्यरात्रीपासूनच मोठ्या विषयांच्या निकालांना सुरुवात होत असल्याची चर्चा परीक्षा भवनात रंगली होती. दरम्यान, या सगळ्या परीक्षांची पुनर्तपासणी आणि त्याचे निकाल तातडीने लावले जावेत, अशी मागणी होत आहेत.

तब्येतीच्या तक्रारीवर तंबी
सतत आठवडाभर उत्तरपत्रिका तपासून डोळ्यांचा त्रास होत असलेल्या एका प्राध्यापिकेला मुंबई विद्यापीठाने उलट तंबी दिली. या प्राध्यापिकेची सहा महिन्यांपूर्वीच डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली. त्यावर सासरी गेल्यावर कारणे देता येत नाहीत, असे अजब उत्तर तिला दिले गेले.

विद्यार्थ्यांच्या तक्रारी
निकालामध्ये गोंधळ असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यंदा विद्यार्थ्यांवर झालेला प्रयोग संतापजनक आहे.
- करण डी, रूपारेल महाविद्यालय