कचऱ्याच्या कंत्राटाची चौकशी करा कॉंग्रेसची आयुक्तांकडे मागणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - स्वच्छ भारत अभियानाच्या निकषानुसार एक लाख लोकसंख्येमागे कचरा उचलण्यासाठी एक ठेकेदार हवा. प्रत्यक्षात अनेक भागात कचरा उचलला जात नसल्याने यात मोठा घोटाळा असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दिलेल्या कंत्राटांची चौकशी करा, अशी मागणी मंगळवारी (ता. 20) कॉंग्रेसने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली. 

कचरा उचलणारे ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये संगनमत आहे. 10 वर्षांपासून अनेक भागात काही ठराविक कंत्राटदारांना कामे मिळत आहेत. ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राट मिळेल, अशा पद्धतीनेच निविदा प्रक्रिया बनवली जाते. त्यामुळेच कंत्राटदार कचरा उचलत नाही, असा आरोप करत या निविदा प्रक्रियेसाठी कंत्राटदारांची चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी मेहता यांच्याकडे केली. तसे पत्र आयुक्तांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. डम्पिंग माफियांवर भाजपने वेळोवेळी आरोप केले आहेत. आता कॉंग्रेसने कचरा उचलण्याच्या कंत्राटावर आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी मेहता यांना चौकशीत काही घोटाळा आढळल्यास शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.