मुलावरील अत्याचारप्रकरणी तीन जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

दोघांची बालगृहात रवानगी; एकाला अटक

दोघांची बालगृहात रवानगी; एकाला अटक
मुंबई - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर पळून गेलेल्या एकाला अटक करण्यात आली आहे. दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीला दिंडोशी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी सात मुलांची रवानगी डोंगरी बालगृहात केली आहे. उर्वरित पाच जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

पीडित मुलगा अंधेरी परिसरात राहतो. वर्षभरापूर्वी या मुलावर एकाने लैंगिक अत्याचार केला होता. बदनामीची धमकी देऊन नंतर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर इतर मुलांनीही या मुलावर असे अत्याचार केले होते. डी. एन. नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सात मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालगृहात केली आहे. या घटनेचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण कक्ष 9 करत होता. प्रभारी वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने गुरुवारी अंधेरी आणि नायगाव परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. पुढील तपासाकरिता त्या तिघांनाही डी. एन. नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. वारंवार होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून काही महिन्यांपूर्वी पीडित मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.