पोलिस महिलेला मद्यपीकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - दारूच्या नशेत एकाने पोलिस महिलेला धक्काबुकी करून मारहाण केल्याची घटना चारकोप पोलिस ठाण्यात घडली. त्याच्याविरुद्ध विनयंभग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष कांबळे असे आरोपीचे नाव असून, तो गोराई परिसरातील रहिवासी आहे. गुरुवारी (ता. 28) सकाळी त्याने त्याच्या नातेवाइकांना मारहाण केली. त्यासंदर्भात तक्रार करण्याकरिता त्याच्या सासूने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या कांबळेला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने पोलिस त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. महिला अधिकाऱ्याने कांबळेला शांत बसण्यास सांगितले. त्या वेळी त्याने धक्काबुकी करून त्या महिला अधिकाऱ्याला मारहाण केली. कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उद्या (ता. 29) त्याला बोरीवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.