नवी मुंबई - जुईनगर येथील बडोदा बॅंकेवरील दरोड्याप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, मालेगावातून दोन जणांना ताब्यात घेतले असल्याचे सूत्रांकडून समजते. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये एका सराफाचा समावेश असून दुसरा त्याचा मदतनीस आहे. आम्ही दरोडा टाकणाऱ्या आरोपींच्या जवळ असून लवकरच प्रकरणाचा पूर्ण तपास लागेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.
बॅंकेवरील दरोड्याला आठवडा झाला असतानाच, नवी मुंबई पोलिसांच्या तपास कार्याला काहीसे यश मिळाले आहे. या प्रकरणी सराफ संजय वाघ याच्यासह त्याच्या सहकाऱ्याला मालेगावातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाघ याच्याकडून दहा तोळ्यांपेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. त्याच्या आणखी सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे. बॅंकेत भुयार खोदून 30 लॉकरमधून कोट्यवधींचा ऐवज चोरण्याच्या कामगिरीसाठी सुमारे दहा पेक्षा अधिक जणांची टोळी सक्रिय असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.
या दरोडेखोरांमध्ये उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतील आरोपींचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे. गुन्ह्यात सहभागी आरोपींनी वेगवेगळी जबाबदारी पार पडली असून जबाबदारी पूर्ण केल्यानंतर पळ काढल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. बॅंकेच्या इमारतीत गाळ्यासाठी भाडेकरार केलेला गेना बच्चन प्रसाद हा मुख्य संशयित असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.
मोटारीतून येऊन रेकी
चोरी करण्यासाठी आरोपी बॅंकेशेजारच्या एका हॉटेलजवळ दररोज मोटारीतून येऊन बॅंकेसमोर रेकी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फरारी आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तब्बल 8 ते 9 पथके विविध राज्यांच्या काना-कोपऱ्यात शोधमोहीम राबवत आहेत. लवकरच गुन्ह्याची उकल होईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
|