महानिरीक्षक स्वाती साठे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना पाठिंबा देणाऱ्या पोलिस महानिरीक्षक स्वाती साठे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी लेखी तक्रार निलंबित तुरुंग अधीक्षक हिरालाल जाधव यांनी नागपाडा पोलिस ठाण्यात, तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे केली आहे. साठे यांचा गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यात हात असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

शेट्ये मृत्यूप्रकरणी तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकर यांच्यासह सहा जणांना अटक झाल्यानंतर साठे यांनी "महाराष्ट्र कारागृह' या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. "आपण अधिकारी आणि कर्मचारी भगिनींना भक्कम आधार देऊ', असे त्यांनी व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून पाठवलेल्या संदेशात नमूद केले होते.

"मंजुळाच्या खूनप्रकरणी सहा पोलिसांना अटक झाल्यानंतर तरी मीडियाचा आत्मा शांत होईल का?' असा संदेशही त्यांनी पाठवला होता. साठेंच्या आवाहनानंतर आरोपींच्या मदतीसाठी पैसे जमा करण्यात येत होते. आरोपींना मदत करणे, त्यांना पाठीशी घालणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, आरोपींच्या मदतीसाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांची मदत मागणे, याबाबत साठे यांची वर्तणूक संशयास्पद असल्याचे जाधव यांनी तक्रारीत नमूद केले आहे.