बलात्कार करणारा आरोपी मोकाट कसा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - नऊ महिन्यांपूर्वी तीन वर्षांच्या मुलीवर शाळेमध्ये झालेल्या कथित बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई - नऊ महिन्यांपूर्वी तीन वर्षांच्या मुलीवर शाळेमध्ये झालेल्या कथित बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शाळेत ही घटना घडून एवढे महिने उलटल्यानंतरही, तसेच पीडित मुलीने आरोपीला ओळखले असूनही पोलिस तपासात ढिसाळपणा का करत आहेत, असा प्रश्‍न खंडपीठाने विचारला. पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही का, शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले आणि त्याची माहिती पोलिसांना दिली, तरीही पोलिस इतर 80 साक्षीदार कशाला तपासत आहेत, अशा शब्दांत न्या. रणजित मोरे आणि न्या. शालिनी फणसळकर-जोशी यांच्या खंडपीठाने पोलिसांची खरडपट्टी काढली. याबाबत खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर राहून बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

लहान मुलांवरील अत्याचारासंबंधित "पॉस्को' कायद्याबाबत न्यायालय किती संवेदनशील आहे, याची जाणीव पोलिसांना नाही का? मग एवढा बेफिकीरपणा पोलिस का दाखवत आहेत, असेही न्यायालयाने सुनावले. या प्रकरणी शाळेतील एका शिक्षिकेसह अन्य काही जणांविरोधात पीडित मुलीच्या आईने तक्रार केली आहे. घटना घडल्यानंतर काही दिवसांनी मुलीला त्रास होऊ लागल्यावर हा प्रकार उघड झाला होता. आरोपीने त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत, असा बचाव सरकारकडून करण्यात आला.