सेल्फी मोर्फिंगद्वारे खंडणीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - सेल्फीची क्रेझ तरुणांमध्ये वाढली आहे. मात्र, धोकादायक सेल्फीच्या प्रयत्नात अनेकांना जीवही गमवावा लागल्याचे प्रकार घडले आहेत. आपला सेल्फी कधीही धोकादायक ठरू शकतो. मध्य मुंबईतील तरुणीला मित्रासोबत काढलेला सेल्फी तिला महागात पडला. आरोपीने मोर्फिंगद्वारे तिच्या छायाचित्राला अश्‍लील स्वरूप देत ती व्हायरल करण्याची धमकी दिली. संबंधित तरुणी आणि तिच्या बहिणीकडे त्याने त्यासाठी लाखोंची खंडणी मागितली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या.

शाकीर खान असे आरोपीचे नाव आहे. तो अंधेरीतील जे. बी. नगर परिसरात राहतो. जानेवारीत अंधेरी येथील एका नाटकाच्या सरावावेळी त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही अनेक वेळा कामानिमित्त भेटायचे. विविध ठिकाणी दोघांनी अनेकदा सोबत सेल्फी काढले होते. काही दिवसांपूर्वी शाकीरला लाखो रुपयांची गरज होती. त्यासाठी त्याने संबंधित तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा कट रचला. त्याने तरुणीसोबत काढलेल्या छायाचित्रांना अश्‍लील स्वरूप देत ती छायाचित्रे तरुणीला पाठवली. ती व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडे अडीच लाखांची खंडणी मागितली. शाकीरने पाठवलेली छायाचित्रे पाहून तरुणीला धक्काच बसला. याबाबत तिने मोठ्या बहिणीला सांगितले. त्या वेळी दोघा बहिणींनी ऍण्टॉप हिल पोलिसांत शाकीरविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अंधेरी येथील घरातून शाकीरला अटक केली.