देवनार आगार होणार बेस्टचे 'इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट हब'

विष्णू सोनवणे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - बोरिवली-पनवेल आणि सीएसटी-पनवेल असे "इंटरसिटी बस मार्ग' सुरू करण्याचा तसेच बेस्टच्या देवनार आगारात "इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट हब' उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा बेस्टने तयार केला आहे. जागांचा व्यावसायिक वापर करण्याच्या अहवालात या प्रकल्पाचा अंतर्भाव आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडेल, असा विश्‍वास बेस्ट प्रशासनाला वाटत आहे.
बेस्ट उपक्रम सध्या आर्थिक संटकात सापडला आहे. बेस्टची वार्षिक तूट 700 कोटी रुपये आहे. परिवहन अधिभार (टीडीएलआर) बंद झाला आहे.

पालिकेने बेस्टला 1600 कोटी कर्ज दिले आहे. 2200 कोटी रुपयांच्या कर्जावर दर वर्षी बेस्ट 250 कोटी व्याज देत आहे. एस्क्रो अकाऊंटवर व्याजाचे 40 कोटी 65 लाख रुपये जमा केल्याशिवाय बेस्टला पैसे वापरता येत नाहीत. त्यामुळे बेस्टला मोठी आर्थिक चणचण जाणवत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन देणेही अवघड झाले आहे.

आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्राईस वॉटर हाऊस कुपर प्रा. लि. आणि आकार आर्किटेक्‍चर ऍन्ड कन्सल्टंट या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी बेस्टची आगारे आणि स्थानके यांचा अभ्यास करून बेस्टच्या जागांच्या व्यावसायिक वापराचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात बेस्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी देवनार आगारात बेस्टचे मुंबईतील "इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब' उभारण्याचा अंतर्भाव केला आहे. टॅक्‍सी, रिक्षा तसेच ओला उबेर आदी खासगी वाहतुकीवर मात करून बेस्टचा महसूल वाढविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचा बेस्ट प्रशासनाचा दावा आहे.

असे असेल हब
देवनार आगाराची एकूण जागा - 12.3 एकर
- हबची बस क्षमता - 2200 ते 2800
- रोजची प्रवासी संख्या - 50 हजार
- सुविधा आणि सुरक्षेविषयी सतर्कता
- बोरिवली - पनवेल, सीएसटी पनवेल वाहतूक
- योगी हॉटेल आणि मैत्री पार्क पीक ऍन्ड ड्रॉप पाईंट

हबमधील सुविधा -
बस दुरुस्तीची आगारात व्यवस्था
बेसमेंटमध्ये 300 गाड्यांची पब्लिक पार्किंगची व्यवस्था
प्रवाशांसाठी वेटिंग एरिया
बस पार्किंगची व्यवस्था
टॅक्‍सी ऑटोसाठी स्वतंत्र मार्गिका

Web Title: mumbai news devnar depo best integrated transport hub