राज्यावर वीजटंचाईचे संकट गडद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - देशभरात वीज प्रकल्पासाठी कोळशाच्या साठ्याची स्थिती सुधारली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौभाग्य योजना उद्‌घाटनाच्या निमित्ताने केले आहे; परंतु महाराष्ट्रात या उलट स्थिती आहे. राज्यातील सगळ्याच वीज प्रकल्पाच्या ठिकाणी कोळशाचा ठणठणाट आहे. काही वीज प्रकल्पांना अवघा अर्ध्या दिवसच कोळसा पुरेल एवढा साठा आहे. तर काही ठिकाणी सरासरी दोन दिवस पुरेल इतका कोळसा आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोळसा साठ्याची स्थिती आणखी चिंताजनक आहे. ऑक्‍टोबर हीटच्या विजेच्या मागणीमुळे कोळसा टंचाईत आणखी भर पडणार आहे.

कोळसा उपलब्ध नसल्याने राज्यातील 14 वीज संच बंद आहेत. त्यामध्ये सरकारी कंपनी महानिर्मिती आणि खासगी वीज संचांचाही समावेश आहे. काही संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहेत; तर काही वीज संच हे महागड्या विजेच्या कारणानेही बंद आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील विजेची मागणी कमी झाली. परिणामी विजेचे भारनियमन गेल्या काही दिवसांमध्ये कमी झाले आहे. पण राज्यात अपेक्षित कोळसा मात्र अजूनही मिळत नाही. कोळशाबाबतच्या नव्या धोरणामुळे वीजनिर्मिती कंपन्यांना 15 दिवसांचा कोळसा साठा करणे अपेक्षित आहे; पण महाराष्ट्रात मात्र काही वीज संचाच्या ठिकाणी अर्ध्या दिवसाचा कोळसा शिल्लक आहे.

पुरवठादार कंपन्यांकडून राज्याला 30 वॅगॉन्स कोळसा पुरवणे अपेक्षित आहे; पण राज्याला सध्या 18 ते 20 वॅगॉन्स कोळसा मिळत आहे. राज्यातील सध्याची विजेची गरज 14 हजार मेगावॉट आहे; पण अल्प मुदतीच्या वीज खरेदीमुळे गेल्या काही दिवसांत भारनियमनाचे संकट टळले आहे.

कोळशाची स्थिती
वीज प्रकल्प - कोळसा उपलब्धतता (दिवस)

भुसावळ युनिट 2 आणि 3 - तीन दिवस
भुसावळ 4 - दीड दिवस
भुसावळ 5- दीड दिवस
चंद्रपूर युनिट 3 ते 7 - 1.93 दिवस
चंद्रपूर युनिट 8 आणि 9 - 1.93 दिवस
खापरखेडा युनिट 5 - 9.65 दिवस
कोराडी युनिट 5 ते 7 - 5 दिवस
कोराडी युनिट 8 ते 10 - 3 दिवस
नाशिक - 3 दिवस
पारस - 1.90 दिवस
परळी युनिट 3 ते 5 - अर्धा दिवस
परळी युनिट 6 आणि 7 - 5.30
परळी युनिट 8 - 3 दिवस