एल्फिन्स्टनचा मच्छीमार्केट परिसर कचऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

दादर - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानचा एल्फिन्स्टनमधील सेनापती बापट मार्गावरील मीनाताई ठाकरे मच्छीमार्केटच्या परिसरात पार बोजवारा उडाला आहे. दररोज सायंकाळी आंध्र प्रदेशमधून ट्रक भरून मासे मार्केटमध्ये उतरवले जातात. मासे ताजे राहावेत म्हणून वापरण्यात आलेला भुसा आणि थर्माकोल मात्र रस्त्यावरच फेकून दिला जातो. त्यामुळे परिसरात कचराच कचरा झाला आहे. तब्बल १७ वर्षांपासून स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

मच्छीमार्केट परिसरात असलेल्या स्वराज्य सोसायटी आणि हनुमाननगर सोसायटीमध्ये राहणारे नागरिक १७ वर्षे कचऱ्याचा त्रास सहन करत आहेत. दररोज सायंकाळी ६ ते ७च्या सुमारास आंध्र प्रदेशमधून मार्केटमध्ये मासे येतात. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून दुपारी साधारण १ वाजेपर्यंत मासे विकले जातात. त्याचा कचरा तिथेच टाकला जात असल्याने परिसरात घाण होते. त्याला दुर्गंधी सुटत असल्याने रहिवाशांना नाक मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. 

स्वराज्य सोसायटीचे अध्यक्ष अशोक मस्कर म्हणाले की, आम्ही वारंवार पालिका प्रशासन, स्थानिक नगरसेविका आणि पोलिस ठाण्यात तक्रार केली; मात्र आश्‍वासनांच्या पलीकडे काहीच मिळाले नाही. सोसायटी कमिटी सदस्य पांडुरंग कदम यांनी मच्छीमार्केट स्थलांतरित करण्याची मागणी केली.

१७ वर्षांपासून त्रास
महेश कदम स्वराज्य हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. ते म्हणाले की, मच्छीमार्केट परिसरात सर्वत्र भुसा, थर्माकोल आणि मच्छीचे घाण पाणी सांडलेले असते. १७ वर्षे आम्ही त्रास सहन करत आहोत. पादचारी आणि वाहनचालकांनाही त्रास होत आहे. अनेकदा अपघातही झाले आहेत. मार्केटमुळे वाहतूक कोंडीही होते. आम्हाला नाईलाजाने अक्षरशः घाणीत राहावे लागत आहे.