कर्नाक बंदर रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई - मशीद बंदर रेल्वेस्थानकाबाहेरील कर्नाक बंदर मार्गाने अनेक वर्षांनंतर गुरुवारी (ता.२०) मोकळा श्‍वास घेतला. 

मुंबई - मशीद बंदर रेल्वेस्थानकाबाहेरील कर्नाक बंदर मार्गाने अनेक वर्षांनंतर गुरुवारी (ता.२०) मोकळा श्‍वास घेतला. 

महानगरपालिकेने राज्य राखीव पोलिस दलाच्या कडेकोट बंदोबस्तात फेरीवाल्यांना हटवले. बेकायदा झोपड्या पाडल्या आणि पदपथावरील दुकानदारांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालवला. पालिकेच्या कारवाईला सोमवारी विरोध करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेने आज पोलिसांचा फौजफाटा घेऊन कारवाई केली. राखीव सुरक्षा दलाचे ५० जवान आणि मुंबई पोलिस दलातील २० जवानांच्या बंदोबस्तात सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या नेतृत्वाखाली आज धडक कारवाई करून ९० फेरीवाल्यांना हटवण्यात आले. १५ झोपड्याही जमीनदोस्त करण्यात आल्या.

कर्नाक बंदरचा परिसर मुंबईतील प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने तेथे दररोज प्रचंड वर्दळ असते. फेरीवाल्यांनी रस्ते आणि पदपथावर अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालण्यासही रस्ता नव्हता. दुकानदारांनीही पदपथावर हात-पाय पसरले होते. परिणामी वाहतूक कोंडीही होत होती. त्यामुळे हा रस्ता मोकळा करण्याची कारवाई पालिकेने सोमवारपासून सुरू केली. सोमवारी झालेल्या कारवाईत फेरीवाल्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही पालिकेने ९६ फेरीवाल्यांना हटवले होते.