रस्ता अडवून उभे राहिले मंडप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मुंबई - रेल्वेस्थानक, बसस्थानक, रिक्षा स्टॅण्ड आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी गणेशोत्सव मंडपांना परवानगी देऊ नये. निदान वाहतुकीला अडथळा होऊ नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही अनेक मंडळांनी यंदा त्याचे उल्लंघन केल्याचे दिसले. विशेष म्हणजे उत्सवकाळात त्यावर कारवाईही झाली नाही.

मुंबई - रेल्वेस्थानक, बसस्थानक, रिक्षा स्टॅण्ड आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी गणेशोत्सव मंडपांना परवानगी देऊ नये. निदान वाहतुकीला अडथळा होऊ नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही अनेक मंडळांनी यंदा त्याचे उल्लंघन केल्याचे दिसले. विशेष म्हणजे उत्सवकाळात त्यावर कारवाईही झाली नाही.

महापालिकेने गणेशोत्सवात मंडपांना कशा प्रकारे परवानगी द्यावी, त्याबाबतचे विस्तृत आदेश न्या. अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. रस्त्यावर रहदारीला अडथळा होईल अशा प्रकारे मंडपांना परवानगी देऊ नये. वाहतूक सुरूच राहील याची काळजी घ्यावी, असे न्यायालयाने महापालिका आयुक्तांना सांगितले होते. आदेशाचा भंग करणाऱ्या मंडपांवर कारवाईचे अधिकारही आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते; मात्र यंदा अनेक ठिकाणी भररस्त्यात मंडप उभे राहूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

वाहतूक बंद केली
गोरेगाव पश्‍चिमेला रेल्वेस्थानकाशेजारी रस्त्यातच मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक सुरू राहिली तरी तिला अडथळे आलेच, पण शेजारच्या अंबामाता देवळाशेजारी तर अधिकृत शेअर रिक्षा स्टॅण्डशेजारीच नोंदणीकृत असलेल्या जय अंबे मित्रमंडळाच्या मंडपाला परवानगी मिळाली होती. हा रस्ता मुळातच चिंचोळा असल्याने मंडप उभारल्यावर त्याच्या व स्कायवॉकच्या खांबामधून केवळ एकच रिक्षा कशी तरी जाईल एवढीच जागा उरली होती. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करून स्कायवॉकच्या खांबाशेजारी असलेला दुसरा अधिकृत शेअर रिक्षा स्टॅण्डही बराच काळ बंद पाडला होता. पहिले काही दिवस येथील रिक्षा वाहतूक दिवसा सुरू असे, पण रात्री मंडपाच्या दोन्ही बाजूंना रस्त्यांवर कुंड्या किंवा भाजीचे क्रेट्‌स वा हातगाड्या लावून रस्ता बंद करण्यात आला होता. नंतर शेवटच्या काही दिवसांमध्ये दिवसभर अशा प्रकारे तेथील वाहतूक बंद करण्यात आली होती. या प्रकाराकडे महापालिका, पोलिस अशा सर्वांनीच दुर्लक्ष केले.

रस्त्याच्या मधोमध जाहिरात कमान
परळच्या एका ज्वेलर्सने तर रस्त्याच्या मधोमध आपल्या जाहिरातीची कमान उभारली होती. मोठी रहदारी असलेल्या आंबेडकर रस्त्यावरून टाटा रुग्णालयाकडे वळणाऱ्या रस्त्यावरच ही कमान बरोबर मध्यभागी उभारण्यात आली होती. या धोकादायक प्रकारामुळे अपघाताचीही भीती होती. विशेष म्हणजे या कमानीशेजारीच भोईवाडा पोलिस ठाण्याची बीट चौकी आहे; तर या कमानीच्या समोरच आंबेडकर रस्त्यापलीकडे महापालिकेच्या एफ दक्षिण प्रभागाचे मुख्यालय आहे.

पार्किंग लॉटमध्ये मंडप
फोर्टच्या हॉर्निमन सर्कल येथील श्री गणेश बाल मित्र मंडळाने तर रस्त्याच्या कडेला गाड्यांसाठी महापालिकेने निश्‍चित केलेल्या पार्किंग स्लॉटमध्येच मंडप उभारला होता. आधीच फोर्ट परिसरात पार्किंगच्या जागा कमी असताना मंडपामुळे आणखी काही जागा रद्द करायला परवानगी कशी मिळाली, अशी चर्चाही रहिवाशांमध्ये होती.