पावसामुळे मुंबई थांबली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

अफवांवर विश्‍वास नको
मुंबईत चक्रीवादळाची शक्‍यता, वांद्रे-वरळी समुद्र सेतू बंद आदी अफवा सोशल माध्यमांवरून झपाट्याने पसरविल्या जात आहेत. त्यावर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन पालिकेने केले आहे. हवामान खात्याकडून मुंबईमध्ये वादळाबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सुधीर नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई - मंगळवारी (ता. १९) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवलेल्या पावसाने आज मुंबईकरांना चांगलेच खेळवले. दिवसभरात कधी रिमझिम, तर कधी मुसळधार खेळी खेळणाऱ्या पावसाचा ईसीजी वर-खाली होत होता. त्यानुसार मुंबईकरांच्या हृदयाचे ठोकेही कमी-जास्त होत होते. पावसामुळे खोळंबा होऊ नये म्हणून अनेकांनी आज घरातच मुक्काम ठोकल्याने एरवी गर्दीने फुलून गेलेली रेल्वेस्थानके आणि लोकल रिकाम्या धावत होत्या. रस्त्यांवरही फारशी वाहने न आल्याने वाहतूक कोंडी टळली. पावसाचा धुंद आस्वाद घेण्यासाठी मरिन ड्राईव्हला होणारी मुंबईकरांची गर्दीही आटली होती.

मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारीही तुफानी बॅटिंग केली. दुपारी १ वाजेपर्यंत मुंबई शहरात धारावी विभागात सर्वाधिक २३.१ मिलिमीटर पाऊस पडला. पूर्व उपनगरात विक्रोळीमध्ये ४२.९२ मिमी व पश्‍चिम उपनगरात दिंडोशी भागात २२ मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली. 

बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. मिलन सबवे, वीर देसाई मार्ग, एअर इंडिया कॉलनी, वांद्र्यातील नॅशनल महाविद्यालय परिसर, चेंबूर, मानखुर्द, भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर, सायन, माटुंगा, दादर, परळ, हिंदमाता, भायखळा, कुर्ला व अन्य काही ठिकाणच्या सखल भागांत पाणी भरले होते. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. 

घरांची पडझड
भांडुपमध्ये खिंडीपाड्यामध्ये साईनाथ मित्रमंडळाजवळील कब्रस्तानाजवळ आठ घरांवर दरड कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्या. जखमी झालेल्या विजयेंद्र जयस्वाल (२७) व कृष्णा यादव (२४) यांना पालिकेच्या मुलुंड सर्वसाधारण रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची दोघांची प्रकृती स्थिर आहे. धारावीतही एक मजली घर कोसळून दोन जण जखमी झाले.

१६८ झाडे पडली
मुंबई शहरात ६०, पूर्व उपनगरात ३७ व पश्‍चिम उपनगरात ७१ अशा एकूण १६८ ठिकाणी झाडे पडली. २१ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या; मात्र त्यात जीवितहानी झालेली नाही.

प्लास्टिक बंदीबाबत धोरण 
आज भरती आणि प्लास्टिकमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत होता. त्यामुळे प्लास्टिक बंदीबाबत लवकरच पालिका आयुक्त अजोय मेहता धोरण आखणार आहेत, अशी माहिती सुधीर नाईक यांनी दिली. 

Web Title: mumbai news heavy rain train