मुंबईत उभारणार मानवी मेंदूची पेढी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मुंबई - ब्रिटनमधील ब्रिस्टॉल शहराच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांपैकी एका रुग्णालयात मानवी मेंदूची पेढी उभारण्यात यावी, अशी सूचना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी नुकतीच केली आहे. पालिका आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या सभागृहात नरवणकर यांनी याबाबत मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला मंजुरी मिळाल्यास ही पेढी उभारण्याचा मार्ग मोकळा होईल. अपघातात मेंदूला इजा झाल्यास किंवा मेंदूसंबंधित आजार झाल्यास रुग्णाला प्राण गमवावे लागतात.

पालिकेने मेंदूची पेढी सुरू केल्यास अशा रुग्णांना दिलासा मिळू शकेल.
मुंबईत रक्तपेढी, नेत्रपेढी, मातृदुग्धपेढी, स्कंधकोशिका (स्टेमसेल्स) पेढी यांसारख्या पेढ्या आहेत. या पेढ्यांमधून गरजू रुग्णांना रक्त, नेत्रपटल आदी आवश्‍यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. मानवी मेंदूच्या पेढीचा अभाव असल्याने अपघातग्रस्त व्यक्ती किंवा मेंदूच्या आजाराच्या रुग्णांना प्राण गमवावे लागतात. अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृत्यूच्या वेळेपासून 72 तासांच्या आत त्याचा मेंदू काढून तो स्कायलिंग बोर्ड पॅकेट ट्युबमध्ये उणे 150 अंश सेल्सिअस तापमानात सुरक्षित ठेवता येऊ शकतो.

मेंदूस इजा पोचल्यास अपघातग्रस्त व्यक्तीच्या किंवा मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना योग्य उपचार मिळण्यासाठी पालिकेने परळ येथील केईएम, मुंबई सेंट्रल येथील नायर किंवा सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मानवी मेंदूची पेढी उभारावी, अशी मागणी नरवणकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.