मुंबईतील पुरुषांमध्ये वंध्यत्व वाढतंय... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

वंध्यत्वावरील उपचारांसाठी येणाऱ्या जोडप्यांपैकी 50 टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते. त्यामागे डीएनए फ्रॅग्मेंटेशन हे कारण असते. त्या दृष्टीने त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. 
- डॉ. रिश्‍मा पै 

मुंबई - जगभर पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. मुंबईतील डॉक्‍टरांच्या मते मुंबईतील पुरुषांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. तणावपूर्ण जीवनशैली, प्रदूषण आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे शहरात वंध्यत्वाचे प्रमाण जास्त असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. 

लग्नाला तीन वर्षे झाल्यानंतरही अंधेरीच्या अमित मल्होत्रा यांना मूल होत नव्हते. तपासण्या आणि चाचण्यांमध्ये अमित यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. त्यांनी नियमित उपचार घेतले. ते म्हणाले, ""आता माझी पत्नी आठ महिन्यांची गर्भवती आहे. माझ्या वंध्यत्वाला काही प्रमाणात मीच जबाबदार आहे. वेळेवर आणि चांगला आहार घेण्याकडे माझे दुर्लक्ष होत असे. काम आणि कामाचा ताण यामुळे कदाचित "स्पर्म काऊंट' कमी झाला असावा. डॉक्‍टरांनी मला वंध्यत्वाची कारणे सांगितली तेव्हा मी ते मान्य केले. औषधोपचारांबरोबर मी जीवनशैलीतही बदल केले आणि शुक्राणूंची संख्या वाढली.'' 

अमितवर उपचार करणाऱ्या नोवा फर्टीलिटी क्‍लिनिकच्या डॉ. रितू हिंदुजा म्हणाल्या, अमितमध्ये अवघे एक लाख शुक्राणू होते. सर्वसामान्यपणे ते 15 लाखांपर्यंत असले पाहिजेत. अमितबाबत औषधोपचारांनी शुक्राणूंची संख्या वाढवणे शक्‍य झाले; पण सर्वच रुग्णांच्या बाबतीत हे शक्‍य होतेच असे नाही. त्यासाठी काही जणांमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. देशात सुमारे अडीच ते साडेतीन कोटी जोडप्यांमध्ये वंध्यत्व असते. त्यात आता 40 ते 45 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरांत ही समस्या मोठी असल्याचे डॉ. हिंदुजा यांनी सांगितले. मुंबईत या समस्येची तीव्रता अधिक आहे. उपचारांसाठी येणाऱ्या व्यक्ती लग्नानंतर आणि जोडीने येतात. त्यामुळे त्याबाबतची फक्त पुरुषांची किंवा फक्त स्त्रियांची अशी वेगवेगळी आकडेवारीची नोंद होत नसल्याचेही डॉ. हिंदुजा यांनी सांगितले. 

मुंबईतल्या पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त आढळते. त्यामागे धकाधकीची जीवनशैली हे कारण असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. "इंडियन असोसिएशन ऑफ गायनॉकॉलॉजिस्ट एण्डस्कोपिस्ट' (आयजीई)च्या अध्यक्ष आणि लीलावती रुग्णालयाच्या स्त्री-रोग आणि वंध्यत्व विभागातील डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या, मुंबईतील पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण 30 ते 50 टक्के आहे. प्रदूषण, तणाव आणि सतत वाहनाने फिरणे आदी कारणांमुळे वंध्यत्व येते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोक मोटरसायकल आणि कारमधून फिरतात. प्रदूषणाबरोबरच गाडीत जास्त वेळ राहिल्याने त्यांच्या दोन पायामध्ये तयार होणारे तापमान शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम करते, असेही डॉ. पालशेतकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाच्या विशेष आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी महापालिकेकडेही वंध्यत्वाबाबतची आकडेवारी नसल्याचे स्पष्ट केले.