सुविधाच्या अभावामुळे कल्याणमध्ये 'नो सर्व्हिस, नो टॅक्स'

सुचिता करमरकर
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मागील दोन महिन्यांपासून नागरिकांच्या अनेक प्रश्नांबाबत आयुक्तांशी पत्र व्यवहार केला आहे.
- घाणेकर

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका नागरिकांना योग्य त्या सोयी सुविधा देण्यात अपयशी ठरत असल्याने 'नो सर्व्हिस, नो टॅक्स' हे आंदोलन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. या विषयात आयुक्त पी वेलारसू यांची भेट न झाल्याने या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले. आयुक्तांची भेट होईपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल असे आंदोलनाचे प्रवर्तक श्रीनिवास घाणेकर यांनी स्पष्ट केले. 

मागील दोन महिन्यांपासून नागरिकांच्या अनेक प्रश्नांबाबत आयुक्तांशी पत्र व्यवहार केला आहे. मात्र आयुक्तांनी या पत्रांना उत्तर देण्याचं सौजन्यही दाखवलं नसल्याने हे आंदोलन उभे करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे घाणेकर म्हणाले. पत्र व्यवहाराबरोबरच घाणेकर यांनी आयुक्तांशी सोशल मिडिया मार्फतही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. आजही कार्यालयात भेटीसाठी आल्यानंतर ते उपलब्ध नसल्याने अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्तांना भेटण्याबाबत निरोप दिला केला. मात्र सक्षम उपायुक्त इथे नाहीत तसेच ज्या अतिरिक्त आयुक्तांविरोधात तक्रार आहे त्यांना भेटून काय करणार असा सवाल त्यांनी केला. 

दरम्यान, दोन ऑक्टोबरपासून  हे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. यासाठी आंदोलनाची हाक देणाऱ्या घाणेकर यांच्यासह सुलेख डोन, उमेश बोरगावकर, अशोक भोईर आज कार्यालयाबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाला महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कल्याण पूर्व, पश्चिम तसेच डोंबिवली, सत्तावीस गावात यासंदर्भात नागरिकांच्या बैठका झाल्या. पालिका आयुक्त पी वेलारसू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कामांच्या पाहणीसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.