मुहूर्त मिळाला... 9 नोव्हेंबरपासून 'येथे' KDMT धावणार...

मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

भाजप परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी कल्याण पूर्व मधील बंद केलेल्या बसेस सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही दिला होता

कल्याण : कल्याण पूर्व मधील विविध मार्गावर धावत असणाऱ्या केडीएमटी बसेस बंद करण्यात आलेल्या त्या पुन्हा सुरू करण्यासाठी मुहूर्त भेटला असून या आठवड्यात गुरुवार ता 9 नोव्हेंबर पासून कल्याण पूर्व मध्ये विविध मार्गांवर केडीएमटी बस धावणार असल्याने नागरिकांत उत्सुकता लागली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम सन 1999 सुरू झाला, उद्देश होता की कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत आणि आजू बाजूच्या शहरातील नागरिकांना कमी पैश्यात चांगली सेवा मिळावी, याधर्तीवर कल्याण पूर्वमध्ये गणपती चौक ते चिंचपाडा, सिद्धार्थनगर ते तिसाईदेवी मंदीर यामार्गावर केडीएमटी बसेस सुरू झाल्या. मात्र प्रशासनाच्या उदासीनता मुळे अनेक मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या. दरम्यान, भाजप परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी कल्याण पूर्व मधील बंद केलेल्या बसेस सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही दिला होता. मात्र केडीएमटी प्रशासनाने कर्मचारी आणि बसेस संख्या कमी असल्याने त्या मार्गावर बसेस सोडण्यास विलंब केल्याने संतापाचे वातावरण होते. अखेर या आठवड्यात गुरुवार ता 9 नोव्हेंबर 2017 सकाळी 11 वाजता गणपती चौक ते चिंचपाडा या मार्गावर बस सुरू होणार आहे. याचे उद्घाटन आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी दिली. 

बसचा मार्ग 
कल्याण पूर्व गणपती चौक पासून बस सुटेल ती नाना पावशे चौक, काटेमानेवली नाका मार्गे चिंचपाडा  असा मार्ग असणार आहे  . 

कल्याण पूर्व ते वाशी बस धावणार...
कल्याण पूर्व मधून अनेक नागरीक नवी मुंबई मध्ये कामा निमित्त जातात. त्यांना बस अथवा रेल्वे साठी कल्याण पश्चिम कडे जावे लागत होते, तो त्रास कमी करण्यासाठी शिवसेना परिवहन समिती सदस्य मधुकर यशवंतराव यांनी कल्याण पूर्व श्रीराम टॉकीज ते वाशी मार्गावर बस सोडण्याची मागणी केली होती. याधर्तीवर रविवार ता 12 नोव्हेंबर 2017 रोजी सभापती संजय पावशे यांच्या हस्ते या मार्गावर धावणाऱ्या बसेसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कल्याण पूर्व मध्ये अनेक वर्षाने केडीएमटी बस धावणार असल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.