कल्याण, डोंबिवली स्थानक परिसरात रिक्षांनी अडवून ठेवले रस्ते

रविंद्र खरात 
रविवार, 30 जुलै 2017

कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरामधील रिक्षामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आरटीओने बनविलेल्या अहवाल प्राप्त झाला असून त्याबाबत वाहतूक पोलिसांचा अभिप्राय आणि केडीएमटीची एनओसी नंतर पुढील निर्णय घेतला जाईल
- पालिका आयुक्त पी वेलरासु

कल्याण - कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरामध्ये रिक्षांनी सर्व रस्ते अडवून ठेवले असून त्यातून सुटका व्हावी यासाठी एक वर्षापूर्वी कल्याण आरटीओने अहवाल बनविला होता तो प्राप्त झाला असून वाहतूक पोलिस यांचा अभिप्राय आणि केडीएमटीची एनओसीनंतर पुढील निर्णय घेऊ अशी माहिती पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी सकाळला दिली . 

कल्याण डोंबिवली शहरात मीटर पद्धतीने रिक्षा धावाव्यात, यासाठी प्रवासी संघटनांनी सन 2011 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रवासी संघटनांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर "रिक्षा तक्रार निवारण समिती‘ स्थापण्यात आली. या समितीची एकही बैठक झाली नाही. त्यामुळे प्रवासी संघटनांनी पुन्हा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे 5 जून 2015 ला पालिका मुख्यालयात अडीच वर्षांनी बैठक झाली.त्यानंतर कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी 8 जून 2015  ला आरटीओ मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्यांची उपसमिती नेमली. त्यात वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे, सहायक पोलिस हर्षद गालिंदे, पोलिस उपनिरीक्षक एस. जी. वेलके, सहायक मोटार वाहन निरीक्षक जयेश देवरे, नगररचनाकर सुरेंद्र टेंगळे, आगार व्यवस्थापक श्‍याम पष्टे, प्रवासी संघटनाचे राजेंद्र फडके, मनोहर निकम, रिक्षा संघटनेचे संतोष नवले आणि मल्हारी गायकवाड यांचा समावेश होता.

कल्याण पूर्व-पश्‍चिम भागाची महिनाभर पाहणी करून वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिक्षास्थानक, बसस्थानक कुठे असावीत, याचा अभ्यास करून शिफारशी सुचवण्यात आल्या  होत्या तो अहवाल कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त ई रविंद्रन यांना सादर करण्यात आला होता , मात्र तो अहवाल धूळ खात पडला होता , कल्याण आरटीओ उप प्रादेशिक अधिकारी नंदकिशोर नाईक यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी  संजय ससाणे यांनी पदभार घेतला , त्यांनी नुकताच तो अहवाल नव्याने आयुक्त पदाची पदभार घेतलेल्या पी वेलरासु यांना सादर केला आहे .

याबाबत पालिका आयुक्त पी वेलरासु यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की कल्याण डोंबिवली मधील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी विविध माध्यमातुन प्रयन्त केला जात आहे , कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरामधील वाढती रिक्षा संख्या पाहता दिवसेंदिवस वाहतुक कोंडी वाढत आहे , याबाबत कल्याण आरटीओ ने अहवाल बनविला आहे तो नुकताच प्राप्त झाला असून त्यावर वाहतुक पोलिसांचा अभिप्राय मागितला असून त्यानंतर केडीएमटीची एनओसी घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी सकाळला दिली . यामुळे कल्याण डोंबिवलीकराना रेल्वे स्थानक परिसर मध्ये लवकरच मोकळा श्वास घेता येणार आहे .

हा अहवाल 24 पानांचा आहे. त्यात कल्याण पश्‍चिमेतील 128; तर कल्याण पूर्वेतील 41 रिक्षास्थानकांची निवड करण्यात आली आहे. केडीएमटीचे 191 बस थांबे सर्व्हे करून निश्‍चित करण्यात आले. याशिवाय शहराची भौगोलिक रचना, रिक्षा व इतर वाहतुकीच्या साधनातील स्पर्धा, प्रवासीवर्गाची लूट याची माहिती देऊन ती टाळण्यासाठी उपाय सुचवण्यात आले आहेत. अहवालानुसार, रेल्वेस्थानक वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी काही रिक्षा थांब्यांवर रिक्षांची संख्या कमी करण्याचा; तसेच काही बस थांबे हलवण्याचे सुचवण्यात आले आहे. दीपक हॉटेल ते साधना हॉटेल आणि महात्मा फुले चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी एकही वाहन वाटेत थांबू नये यासाठी रिक्षा संघटना, प्रवासी संघटना, वाहतूक पोलिस यांनी एकत्र येऊन मोहीम राबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.