महापौरांचा अधिकाऱ्यांना दम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या १०० बस १ जुलैपासून रस्त्यावर आणा, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, तीन महिन्यांत केडीएमटीच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर नागरिकांच्या सोईसाठी खासगीकरणाचा विचार करू, असा सज्जड दम अधिकारी वर्गाला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी बुधवारच्या आढावा बैठकीत दिला.

कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या १०० बस १ जुलैपासून रस्त्यावर आणा, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, तीन महिन्यांत केडीएमटीच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर नागरिकांच्या सोईसाठी खासगीकरणाचा विचार करू, असा सज्जड दम अधिकारी वर्गाला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी बुधवारच्या आढावा बैठकीत दिला.

महापौर देवळेकर यांच्या दालनात बुधवारी पालिका परिवहन उपक्रमाच्या कारभाराबाबत आढावा बैठक झाली. महापौर देवळेकर, शिवसेना पालिका गटनेते रमेश जाधव, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, मनसे गटनेता प्रकाश भोईर, नगरसेवक प्रकाश पेणकर, परिवहन समिती सदस्य आणि महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे बैठकीला उपस्थित होते. तब्बल दोन तासांहून अधिक काळ ही बैठक सुरू होती. त्यानंतर महापौरांनी ‘सकाळ’ला सांगितले की, काही कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे बस रस्त्यावर येत नाहीत; मात्र आता सहन केले जाणार नाही. येत्या १ जुलैपासून १०० पेक्षा जास्त बस रस्त्यावर आल्या पाहिजेत. बंद केलेले मार्ग पुन्हा सुरू करा. एखादी बस खराब झाली तर सुटे पार्ट खरेदी करण्यासाठी जी फाईल आहे ती लेखा विभागात महिनोन्‌महिने फिरता कामा नये. कामचुकार अधिकारी, कर्मचारी वर्गाला घरचा रस्ता दाखवा, असे आदेश महापौर देवळेकर यांनी केडीएमटी प्रशासनाला दिले. आगामी तीन महिन्यांत उत्पन्न वाढले नाही किंवा त्यासाठी नियोजन केले नाही तर नागरिकांसाठी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

केडीएमटी खर्च आणि उत्पन्न या बाबी तपासून पाहण्यात आल्या. रिक्षा आणि फेरीवाल्यांचा अडथळा येतो तेथे पालिका, वाहतूक पोलिस आणि आरटीओची मदत घेऊन नागरिकांची त्रासातून सुटका करा, असे आदेश त्यांनी दिले. मनसे गटनेते प्रकाश भोईर, रमेश जाधव, प्रकाश पेणकर यांनी उत्पन्न वाढीसाठी सूचना केल्या.

पावशे गैरहजर
परिवहन विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीत परिवहन समिती सभापती संजय पावशे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती. पावशे बाहेरगावी गेल्याने ते आले नसल्याची माहिती परिवहन समिती सदस्यांनी दिली.