केडीएमटीची उद्‌घाटने जोमात; सेवा कोमात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या केडीएमटीच्या डोंबिवली पश्‍चिमेकडील विविध ठिकाणच्या परिवहन सेवा बंद झाल्या आहेत. कमी प्रवासीसंख्या आणि घटलेले उत्पन्न या कारणामुळे या सेवा बंद केल्याचे परिवहन प्रशासनाने सांगितले असले, तरी सुविधांअभावी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. नाइलाजाने त्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.    

काही महिन्यांपूर्वी डोंबिवली स्थानकापासून गरिबाचा वाडा, जुनी डोंबिवली ते आनंदनगर-दोन टाकी, फुले रोड ते डोंबिवली स्थानक अशी परिवहनची सेवा मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली होती; मात्र आता ही सेवा बंद झाली आहे. येथील नागरिकांना अन्य पर्याय नसल्याने रिक्षासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. एकीकडे परिवहनचे उत्पन्न घटत असल्याची बोंबाबोंब करण्यात येत आहे; मात्र दुसरीकडे परिवहन सेवाच बंद करण्यात आल्यामुळे उत्पन्न वाढणार तरी कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

डोंबिवली स्थानकाच्या पूर्वेकडून नुकतीच परिवहनची सेवा सुरू करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे; मात्र पुन्हा पश्‍चिमेकडील सेवेप्रमाणे ही सेवासुद्धाही कमी प्रवासी आणि उत्पन्नाचे कारण देत बंद केली जाणार का? असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहेत.  

स्वागतासाठी करावी लागली प्रतीक्षा
काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे समांतर रस्त्याच्या परिसरातही परिवहनची सेवा नव्याने सुरू करण्यात आली होती; मात्र उद्‌घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच या बस सेवेच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या भाजप नगरसेवकांना तब्बल दोन तास बसची वाट पाहत उभे राहावे लागल्याने सत्ताधारी पक्षालाच महापालिकेच्या परिवहन सेवेचा कटू अनुभव आला होता. 

प्रवाशांची संख्या कमी असल्याने सेवा बंद करण्यात आली. डोंबिवली पूर्वेकडील नव्याने सुरू केलेल्या सेवेप्रमाणे मार्ग वाढवून पश्‍चिमेकडील सेवाही पूर्ववत करण्यात येईल. 
- देवीदास टेकाळे, परिवहन व्यवस्थापक. 

एक ना अनेक कारणे देत परिवहन सेवा वारंवार बंद होत असल्याने या सेवेवरून नागरिकांचा विश्‍वास उडू लागला आहे. नीट सेवाच दिली नाही तर उत्पन्न कसे वाढणार?
- राजेश कदम, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे.

Web Title: mumbai news KDMT dombivli