चेंबूर नाक्‍यावर गॅसची गळती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - चेंबूर नाका परिसरात "एलपीजी'ची पाइपलाइन फुटल्यामुळे सोमवारी सकाळी गॅसगळती झाली. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाला ही गळती रोखण्यात यश आले. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाबाहेर असलेल्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती सुरू झाली होती. याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसरातील वाहतूक व नागरिकांची ये-जा बंद केली होती. भारत पेट्रोलियमच्या कर्मचाऱ्यांनी गॅस पाइपलाइन बंद केल्यानंतर दुपारी 12.30च्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू झाली. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.