ठाकरे स्मारकासाठी महापौर बंगल्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कजवळचा महापौर बंगला देण्यास विरोध होत आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करण्यासही जनहित मंच या संघटनेने विरोध केला आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी प्राथमिक सुनावणी झाली. पुढील आठवड्यात सविस्तर सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट करत सुनावणी तहकूब करण्यात आली.

जनहित मंचाच्या वतीने भगवानदास रयानी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार सरकारी बंगला स्मारकासाठी देणे सर्वोच्च न्यायालयाच्या 2013 मधील आदेशानुसार केंद्र सरकारने 2014 मध्ये काढलेल्या अधिसूचनेचा भंग आहे. राजकीय नेत्याच्या स्मारकासाठी अशा पद्धतीने बंगला देता येत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. सरकारी निवासस्थान असलेल्या बंगल्यात स्मारक करता येत नाही, असा दावा करत याबाबत मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनाही कळवण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.