विष्णू सूर्या वाघ यांना पाठिंब्यासाठी सभा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई - गोव्यातील साहित्यिक व आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्या "सुदिरसूक्त' या कवितासंग्रहातील "फरक' या कवितेवरून वाद निर्माण झाला असून, त्यांच्यावर "एफआयआर' दाखल करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मराठी साहित्यिक एकत्रित आले असून, बुधवारी (ता. 25) सायंकाळी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीच्या प्रांगणात निषेध सभा घेऊन वाघ यांना पाठिंबा देण्यात येणार आहे.

गोव्यातील साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील जडणघडणीत कवी विष्णू सूर्या वाघ यांचा महत्त्वाचा वाटा आहे. बहुजन समाजाच्या व्यथा-वेदना ठामपणे ते लेखनातून मांडत असतात. "सुदिरसूक्त' या कवितासंग्रहातील एका कवितेत त्यांनी स्वतःला उच्चभ्रू म्हणवणाऱ्या वर्गावर घणाघात केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वाघ हे सध्या रुग्णशय्येवर आहेत. नेहमी बहुजनांच्या बाजूने हिरिरीने उभ्या राहणाऱ्या या कवीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या या प्रयत्नांविरोधात मुंबईतील काही कवींनी आवाज उठवला आहे.

कवयित्री नीरजा, कवी महेश केळुसकर, सौमित्र, इब्राहिम अफगाण आणि मान्यवर निषेध सभेत सहभागी होऊन या मुस्कटदाबीविरोधातील आवाज बुलंद करणार आहेत.