मेगाब्लॉकचा मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कल्याण - ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाण पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे आधीच रेल्वेसेवा विस्कळित झाली होती. त्यात सकाळी ९ नंतरचा मेगाब्लॉकमुळे कल्याणपुढील रेल्वे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

ठाकुर्ली रेल्वेस्थानकाजवळ महत्त्वपूर्ण काम होणार असल्याने रविवारी (ता.२०) सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मेगाब्लॉक झाला. या काळात कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान पूर्णपणे रेल्वे सेवा बंद होती. डोंबिवली ते मुंबई सीएसटी, तर कल्याण ते कसारा, कर्जतच्या दिशेने विशेष लोकल सेवा सुरू केली; मात्र शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकल उशिरा धावत होत्या. दुसरीकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. 

केडीएमटीचा दिलासा 
मेगाब्लॉक असल्याने कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान विशेष केडीएमटी बससेवा सुरू करण्यात आली होती. या वेळेत ३४ बस सोडण्यात आल्या. त्यातून १२ ते १३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. महापौर राजेंद्र देवळेकर, परिवहन समिती संजय पावशे, परिवहन अधिकारी संदीप भोसले, रेल्वे अधिकारी डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर सकाळपासून नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बस सोडण्याच्या ठिकाणी पाहणी करत होते.

रिक्षाचालकांची पुन्हा दादागिरी
मेगाब्लॉकचा फायदा उठवत कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून ठाणे प्रतिसीट २०० रुपये, पनवेल १५० रुपये, तर डोंबिवली प्रतिसीट ५० रुपये रिक्षाभाडे आकारले. त्यांची दादागिरी या वेळीही कायम होती.