मुंबईत मेट्रो-3ची कामे रात्री नकोत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - कुलाबा ते वांद्रे या मेट्रो रेल्वे-3 प्रकल्पाचे काम रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी हंगामी मनाई केली. या कामामुळे स्थानिकांना होणाऱ्या त्रासामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला.

दक्षिण मुंबईत सध्या मेट्रो-3चे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाने मेट्रोच्या प्रस्तावित मार्गात बॅरिकेड आणि पत्रे लावली आहेत. काम लवकर पूर्ण करण्याच्या हेतूने हे काम रोज 24 तास सुरू ठेवण्यात येत होते; मात्र त्यामुळे सतत होणारा यंत्रांचा आवाज, उडणारी धूळ आणि प्रदूषण यामुळे नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे, अशी तक्रार करणारी याचिका स्थानिक नागरिक रॉबिन जयसिंघानी यांनी न्यायालयात दाखल केली आहे.

परिसरात दिवसभर लोकांची वर्दळ असल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे रात्री करणे सोईचे ठरते, असा खुलासा मेट्रो प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठाने तूर्तास दोन आठवड्यांसाठी बांधकाम किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या कामांसाठी मनाई केली. न्यायालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची बाजूही ऐकणार आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.