मेट्रोची 'छुपी' दरवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

भाडे न वाढवता सवलतीत घट
मुंबई - थेट भाडेवाढ न करता मेट्रोच्या सवलतीत घट करत प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचा छुपा प्रकार मुंबई मेट्रो 1 ने केला आहे.

भाडे न वाढवता सवलतीत घट
मुंबई - थेट भाडेवाढ न करता मेट्रोच्या सवलतीत घट करत प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचा छुपा प्रकार मुंबई मेट्रो 1 ने केला आहे.

मेट्रोकडून रिटर्न जर्नी, एका महिन्यात 45 ट्रिप पास देण्यात येत होता; मात्र या प्रवासाच्या सवलतीत घट केल्याने प्रवाशांच्या खिशाला आपोआपच मोठी कात्री लागली आहे. या सवलतीचे नवे दर आजपासूनच लागू करण्यात आले.

मेट्रोचे सध्याचे भाडे हे 10, 20, 30 आणि 40 रुपये आहे; मात्र जास्तीत जास्त प्रवासी मिळावेत आणि उत्पन्न वाढावे या दृष्टीने मुंबई मेट्रो 1 कडून विविध प्रकारे सवलत देण्यात येत आहे. दिवसाला 90 लाख रुपये नुकसान सोसावे लागत असल्याने भाडेवाढ मिळावी, यासाठी गेल्या वर्षभरापासून मेट्रोकडून प्रयत्न केले जात आहेत; परंतु भाडेवाढीला मान्यता मिळत नसल्याने अखेर सवलतीतच घट करण्याचा निर्णय घेतला. या सवलतीचे दर नव्याने ठरवून त्यात घट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

वर्सोवा ते घाटकोपर या रिटर्न जर्नी तिकीटासाठी आता प्रवाशांना 70 रुपये द्यावे लागणार आहेत. या आधी या प्रवासासाठी 60 रुपये घेण्यात येत होते. तर वर्सोवा ते अंधेरीसाठी 35 रुपये द्यावे लागतील. 45 दिवसांच्या ट्रिप पास सेवेतही मोठी भाडेवाढ झाली आहे. यापूर्वी दोन टप्पे असणारा ट्रिप पास आता तीन टप्प्यात तयार करण्यात आला आहे. पूर्वी 45 दिवसांचा ट्रिप पास अनुक्रमे 675 आणि 900 रुपये एवढा होता. आता हाच पास तीन टप्प्यात 750, 1050 आणि 1,350 रुपये एवढा असेल.

मेट्रोच्या भाडे दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सवलतीत मात्र घट करण्यात आल्याचे मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले.

स्टोअर व्हॅल्यु पास महाग
महत्त्वाची बाब म्हणजे मेट्रोकडून स्टोअर व्हॅल्यु पास सेवाही देण्यात येत आहे. त्यामध्ये वर्सोवा ते घाटकोपरसाठी 32 रुपये द्यावे लागत होते. आता त्यासाठी 35 रुपये माजावे लागतील. तर वर्सोवा ते अंधेरीसाठी 18 रुपये द्यावे लागतील.