मिठीवरील पूल तीन वर्षांपासून रखडला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - पवई येथील फिल्टर पाडाजवळील मिठी नदीवरील पुलाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. यामुळे नागरिकांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागते. महापालिका प्रशासनाच्या वेळकाढूपणाविरोधात स्थानिक विद्यार्थ्याने थेट पोलिस ठाण्यातच तक्रार दाखल केली आहे. 32 किलोमीटरचा कोस्टल रोड बांधण्याचे स्वप्न पाहणारी महापालिका गेल्या तीन वर्षांत काही फूट लांबीचा पूल बांधण्यात अपयशी ठरली आहे. 

पवई फिल्टरपाडा येथील जयभीमनगरजवळ मिठी नदीवर पूल बांधण्यासाठी महापालिकेने 2012 मध्ये निधी मंजूर केला होता. त्यानंतर, 2014 मध्ये कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले; मात्र अद्याप या पुलाचे कामकाज सुरू झालेले नाही. स्थानिक विद्यार्थी पवन पाल याने याबाबत पालिकेकडून माहिती घेतली असता प्रस्तावित पुलाच्या परिसरात अतिक्रमण असल्याने हे काम सुरू करता येणार नसल्याचे पालिकेच्या एस प्रभाग कार्यालयातून सांगण्यात आले; मात्र संपूर्ण रस्ता मोकळा असल्याचा दावा पाल याने केला. तीन वर्षांपासून पुलाचे काम सुरूही झाले नाही. त्यामुळे निविदेची मुदतही संपत आली आहे. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा निविदा मागवावी लागणार आहे. त्यामुळे पुढील किमान दोन ते तीन वर्षे पुलाचे काम होणे शक्‍य नाही, असा आरोपही त्याने केला आहे. त्याचबरोबर पुलाच्या बांधकामाचा खर्चही वाढणार आहे. 

पालिकेच्या या वेळकाढू कारभाराविरोधात पाल याने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नागरिकांना इजा होईल, या हेतूने कायद्याचे पालन न करणे, तसेच कटकारस्थान रचणे या कलमांखाली महापालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता, एस विभागाचे सहायक आयुक्त आणि कंत्राटदार देव इंजिनिअर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

जुना पूल कधीही वाहून जाईल 
जय भीमनगरला जोडणारा मिठी नदीवरील पुलाचा पिलर कमकुवत झाला आहे. पावसाळ्यात नदीच्या प्रवाहामुळे तो कधीही वाहून जाईल, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. पालिकेच्या पूल विभागानेही गेल्या वर्षी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची सुचना प्रभाग कार्यालयाला केली होती. नव्या पुलाचे बांधकाम होत नाही तोपर्यंत हा पूल बंद करता येणार नाही. 

Web Title: mumbai news Mithi River