मनसेच्या गटनेतेपदी संजय तुर्डे यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची महापालिकेच्या गटनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 27) महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर आणि चिटणीस कार्यालयाला दिले आहे. त्यामुळे आता तुर्डे यांना इतर सहा नगरसेवकांना व्हिप बजावण्याचा अधिकार मिळाला असल्याचा दावा मनसेने केला आहे. मात्र, कोकण आयुक्तांच्या मंजुरीशिवाय तुर्डे गटनेते होऊ शकत नाहीत, असा दावा शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेत प्रवेश केलेल्या मनसे नगरसेवकांची स्वतंत्र गट म्हणून नोंदणी झालेली नाही, अथवा त्यांचा शिवसेनेच्या गटात समावेश झालेला नाही, असे पत्र कोकण आयुक्तांनी गुरुवारी दिल्यानंतर आज राज ठाकरे यांनी नवे फासे फेकले. हे सहा नगरसेवक मनसेतच असल्याने मनसेच्या गटनेतेपदावरून दिलीप लांडे यांना हटवून त्या जागी संजय तुर्डे यांची नियुक्ती करावी, असे पत्र ठाकरे यांनी महापौर आणि चिटणीस कार्यालयाला दिले आहे. संजय तुर्डे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असल्याने ते इतर सहा नगरसेवकांना पक्षादेश काढू शकतात. तुर्डे यांनी बजावलेला पक्षादेश या सर्व नगरसेवकांना पाळणे बंधनकारक असल्याचा दावा मनसे करत आहे. त्यांनी हा पक्षादेश न पाळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असेही मनसेच्या सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेने मनसेचा दावा खोडून काढला आहे. सर्व नगरसेवकांच्या सहमतीने गटनेता नियुक्त केल्याचे पत्र कोकण आयुक्तांना सादर करावे लागते. त्यानंतर गटनेत्याची नियुक्ती होते. सर्व नगरसेवकांची सहमती असल्याशिवाय गटनेतेपदी नियुक्ती होत नाही, असे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी सांगितले.