मुस्तफा डोसासह फिरोजलाही फाशी द्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरण- ब मधील आरोपी मुस्तफा डोसासह फिरोज अब्दुल रशीद खानलाही कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयात मंगळवारी (ता. 27) केली. या बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार याकूब मेमनइवढेच मुस्तफा डोसा आणि फिरोज खान घातक आहेत, असा दावा सीबीआयने केला. 

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईतील या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी गेल्या आठवड्यात विशेष टाडा न्यायाधीश जी. डी. सानप यांनी गॅंगस्टार अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यासह एकूण सहा जणांना दोषी ठरवले आहे; तर एकाला दोषमुक्त केले आहे. तीन दिवसांपासून सीबीआयचे विशेष सरकारी वकील दीपक साळवी आरोपींच्या शिक्षेबाबतचा युक्तिवाद करीत आहेत. 

मुस्तफा डोसा आणि फिरोज खानला फाशी ठोठावण्याची मागणी करताना, सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले दिले. त्यांनी या युक्तिवादादरम्यान 22 मुद्दे मांडले. या दोन्ही आरोपींचा केवळ बॉम्बस्फोटात सहभाग नव्हता, तर ते या स्फोटातील मुख्य सूत्रधार असलेल्या दाऊद इब्राहिमच्या सातत्याने संपर्कात होते. बॉम्बस्फोटाचा कट शिजवण्यासाठी दुबईतील व्हाईट हाऊसमध्ये दाऊदच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांनाही या दोघांची हजेरी होती. त्यामुळे त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली. 

उद्याही अन्य आरोपींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद होणार आहे. करिमुल्ला आणि ताहिर टकल्या या आरोपींच्या शिक्षेबाबतच्या युक्तिवादाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर रफीकच्या शिक्षेबाबत तर गॅंगस्टार अबू सालेमच्या शिक्षेबाबतचा युक्तिवाद सर्वात शेवटी केला जाणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.