मुंबई महापालिका वाऱ्यावर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - बेस्टच्या महाव्यवस्थापकांसह मुंबई महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांची गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन आठवड्यांची ‘ड्युटी’ लावण्यात येणार आहे. राज्यातील २३ सनदी अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी निवड झाली असून, पहिल्यांदाच चारही अतिरिक्त आयुक्तांसह महाव्यवस्थापक मुंबईला वाऱ्यावर सोडून गुजरातला जाणार आहेत.

मुंबई - बेस्टच्या महाव्यवस्थापकांसह मुंबई महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांची गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन आठवड्यांची ‘ड्युटी’ लावण्यात येणार आहे. राज्यातील २३ सनदी अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी निवड झाली असून, पहिल्यांदाच चारही अतिरिक्त आयुक्तांसह महाव्यवस्थापक मुंबईला वाऱ्यावर सोडून गुजरातला जाणार आहेत.

९ व १४ डिसेंबरला होणाऱ्या गुजरातमधील मतदानासाठी निरीक्षक म्हणून राज्यातील २३ सनदी अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाने निश्‍चित केली आहेत. त्यात बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ए. कुंदन, विजय सिंघल आणि ए. एल. जऱ्हाड यांची नावे आहेत. याआधीही पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना इतर राज्यांमधील निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र, यंदा प्रथमच एकाच वेळी चार अतिरिक्त आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांची निवड झाली आहे.

पालिकेच्या १२० खात्यांची जबाबदारी चार अतिरिक्त आयुक्तांवर असते. एकाच वेळी चारही आयुक्त मुंबई बाहेर गेल्यास त्यांच्या कामाची जबाबदारी कोणावर सोपवावी, असा पेच आयुक्त अजोय मेहता यांच्यासमोर आहे. अतिरिक्त आयुक्त नसल्याने मुंबई पालिकेचा एकही प्रशासकीय निर्णय होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माजी अतिरिक्त आयुक्तांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

बेस्ट उपक्रमाची परिस्थिती अधिकच बिकट आहे. बेस्ट सध्या आर्थिक संकटाशी झगडत आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक मुंबईबाहेर गेल्यास मोठी अडचण होण्याची शक्‍यता आहे. ते सुटीवर गेल्यानंतर त्यांच्या कामाची जबाबदारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर सोपवली जाते. मात्र, अतिरिक्त आयुक्तही गुजरातला जाणार असल्याने पालिका आयुक्तांची कोंडी होणार आहे.

आयुक्तांचा आक्षेप 
व्यवस्थापकांसह चारही अतिरिक्त आयुक्तांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यासंदर्भात आयुक्त अजोय मेहता यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर आयुक्तांचे मत लक्षात घेऊनच निवडणूक कामासाठी पालिकेतील सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आश्‍वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

‘त्यांचे’ काम कोण करणार?
पालिकेतील कोणत्याही प्रशासकीय कागदावर अतिरिक्त आयुक्तांची स्वाक्षरी झाल्याशिवाय तो आयुक्तांकडे जात नाही. एखादा अतिरिक्त आयुक्त सुटीवर असल्यास तात्पुरती जबाबदारी दुसऱ्या अतिरिक्त आयुक्तांवर सोपवली जाते. मात्र, चारही अतिरिक्त आयुक्तांनंतर केवळ उपायुक्त निधी चौधरी पालिकेतील एकमेव आयएएस अधिकारी आहेत. आतापर्यंतच्या कधीही अतिरिक्त आयुक्तांच्या कामाचा पदभार उपायुक्तांवर सोपवण्यात आलेला नाही. त्यामुळे संपूर्ण कामकाजच कोलमडण्याची शक्‍यता आहे.