निकालांसाठी आता 5 ऑगस्टची तारीख

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाचे निकाल घोषित करण्यासाठी आता 5 ऑगस्टची तारीख पाळा असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू संजय देशमुख यांना कळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत ही माहिती दिली.

मुंबई - मुंबई विद्यापीठाचे निकाल घोषित करण्यासाठी आता 5 ऑगस्टची तारीख पाळा असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू संजय देशमुख यांना कळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत ही माहिती दिली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज औचित्याचा मुद्दा उपस्थित करत याकडे लक्ष वेधले. 31 जुलैचा मुहूर्त टळला. या दिवसाचे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते, त्याबद्दल त्यांच्यावर विधान परिषदेत हक्कभंग आणला जाणार आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर देताना, ""मुंबई विद्यापीठाने सर्व उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांनाही ही पद्धत नवी असल्याने विलंब होत गेला. पहिल्याच वर्षी मूल्यांकन पूर्णतः ऑनलाइन करणे योग्य होते काय, यावर विचार होईल. पण सध्या मूल्यांकन पूर्ण करणे हा सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे,'' असे सांगितले.

एकूण 17 ते 17.50 लाख उत्तरपत्रिकांपैकी 14 लाख उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या आहेत. मात्र त्या-त्या परीक्षेच्या सर्व उत्तरपत्रिका तपासल्याशिवाय निकाल घोषित होऊ शकत नाही. 477 परीक्षांपैकी 171 निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती तावडे यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवी पद्धत एकदम लागू न करता टप्प्याटप्प्याने लागू करायला हवी होती काय, याचा विचार योग्य पातळीवर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.