आगीत खाक झालेली तैलचित्रे पुन्हा रेखाटणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सभागृहाला सन 2000 मध्ये लागलेल्या आगीत खाक झालेली नऊ तैलचित्रे पुन्हा रेखाटली जाणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासन 47 लाख रुपये खर्च करणार आहे. ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कुमार कदम यांच्या कुंचल्यातून ही चित्रे साकारणार आहेत.

पालिका सभागृहात मुंबई शहर आणि महापालिकेच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या 11 व्यक्तींची तैलचित्रे होती. 2000मध्ये लागलेल्या आगीत जगन्नाथ शंकरशेठ आणि मोरेश्‍वर दोंदे यांची तैलचित्रे वगळता अन्य नऊ चित्रे खाक झाली होती. या चित्रांबाबत कोणतीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नसल्याने आतापर्यंत ही चित्रे लावली नव्हती.

चंद्रकला कदम यांनी या चित्रांचा अभिलेख शोधून काढल्यामुळे ही चित्रे रेखाटण्याची जबाबदारी महापालिकेने त्यांच्यावर सोपविली आहे. आठ फूट उंच आणि पाच फूट रुंदीच्या प्रत्येक तैलचित्रांसाठी पालिका पाच लाख 25 हजार रुपये खर्च करणार आहे. पालिकेतील गटनेत्यांच्या सोमवारी (ता. 12) झालेल्या बैठकीत या नऊ तैलचित्रांसाठी 47 लाख 25 हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

यांची तैलचित्रे रेखाटणार
विठ्ठल चंदावरकर, जहांगीर वी. बोमन बेहराम, सदाशिव कानोजी पाटील, विठ्ठलभाई जवेरभाई पटेल, इब्राहिम रहिमतुल्ला, सर फिरोजशहा मेरवानजी मेहता, दिनशा रदुलजी वाच्छा, युसूफ जे मेहरअली, खुर्शेद प्रामजी नरीमन.