निर्माल्य द्या... सेंद्रिय खत न्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

जोगेश्‍वरी - ओला कचरा, हार, फुलांच्या निर्माल्यापासून खत बनवण्याचा उपक्रम महापालिका अनेक वर्षांपासून राबवत आहे. यंदा भाविकांकडून घेण्यात येणाऱ्या निर्माल्याच्या मोबदल्यात त्यांना जागेवरच खत देण्याचा स्तुत्य उपक्रम महापालिकेच्या के पूर्व कार्यालयाने गणेशमूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने हाती घेतला होता. जोगेश्‍वरी आणि विलेपार्ले तलावात गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना हे खत वाटण्यात आले.

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनापासून ते सात दिवसांपर्यंतच्या गणपती विसर्जनापर्यंत महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जोगेश्‍वरी शामनगर तलाव आणि विलेपार्लेतील हेगडेवार मैदानात भाविकांकडून निर्माल्य जमा केले. या दोन्ही ठिकाणी पालिकेच्या घनकचरा विभागाने ‘ऑर्गेनिक वास्ट कन्व्हर्टर’ मशीनद्वारे निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम प्रथमच राबवला. दोन्ही ठिकाणी निर्माल्यापासून खत बनविण्याचे मशीन बसवण्यात आले असून, १० दिवसांमध्ये निर्माल्यावर प्रक्रिया करून येथे मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर हे खत पाकीटबंद करून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाटण्यात आले. ज्या भाविकांनी निर्माल्य दिले त्यांनाच खताचे पाकीट देण्यात आले. गणरायाच्या चरणी वाहिलेले निर्माल्य सेंद्रिय खताच्या रूपात परत देण्यात येत आहे, असा संदेशच या खताच्या पाकिटांवर देण्यात आला होता. 

५०० किलो निर्माल्यावर प्रक्रिया
जोगेश्‍वरीतील शामनगर तलाव व विलेपार्लेतील हेगडेवार मैदान या दोन्ही ठिकाणी पालिकेकडून ‘ऑर्गेनिक वास्ट कन्व्हर्टर’ मशीन बसवण्यात आल्या आहेत. या मशीनमुळे एकाच वेळी ५०० किलो वजनाच्या निर्माल्यावर प्रक्रिया करण्यात येते.