पाऊस आणि इंटरनेटमुळे पेपर तपासणी मंदावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मुंबई विद्यापीठाचा न्यायालयात दावा
मुंबई - मुंबईला दोन दिवस बसलेला पावसाचा तडाखा आणि गणेशोत्सवामुळे उर्वरित उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाची गती पूर्वीपेक्षा मंदावली. त्यात इंटरनेटही बंद झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास उशीर होत आहे, अशी कबुली मुंबई विद्यापीठाने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

मुंबई विद्यापीठाचा न्यायालयात दावा
मुंबई - मुंबईला दोन दिवस बसलेला पावसाचा तडाखा आणि गणेशोत्सवामुळे उर्वरित उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाची गती पूर्वीपेक्षा मंदावली. त्यात इंटरनेटही बंद झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास उशीर होत आहे, अशी कबुली मुंबई विद्यापीठाने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

गणेशोत्सवाचे दिवस असल्यामुळे अनेक प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आलेले नाहीत. त्यात दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस पडला. रेल्वेसह सर्व सेवांची दाणादाण उडाली. याचा फटका विद्यापीठाच्या पेपर तपासणीलाही बसला. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता आणि इंटरनेटही बंद पडले होते. विद्यापीठाचा सर्व्हरही डाउन झाल्याने अनेक परीक्षांचे निकाल जाहीर होऊनही ते विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता आले नाहीत, अशी माहिती विद्यापीठाच्या वतीने ऍड. रुई रॉड्रिग्ज यांनी न्यायालयाला दिली. नव्या सर्व्हरचे काम सुरू असून गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्व यंत्रणा सुरू होण्याची शक्‍यता आहे, असेही रॉड्रिग्ज यांनी न्यायालयात सांगितले.

निकाल रखडल्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात केलेल्या याचिकांवर न्या. अनुप मोहता आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आतापर्यंत कला शाखेचे 151 (एकूण 153 गट). शास्त्र 45 (47), वाणिज्य 30 (50), व्यवस्थापन 32 (36) आणि तंत्रज्ञान 170 (175) निकाल जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित निकाल लवकरात लवकर लावण्याचे प्रयत्न विद्यापीठ करीत आहे, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

कायदा शाखेच्या सीईटीची मुदत सहा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचेही या वेळी सीईटी आयुक्तांच्या वतीने ऍड्‌. एस. एस. पटवर्धन यांनी सांगितले. याचिकांवर पुढील सुनावणी सहा सप्टेंबरला आहे.

कॉलेजात गुणपत्रिका
विद्यापीठाने जाहीर केलेले अनेक परीक्षांचे निकाल इंटरनेट बंद पडल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ते ऑनलाइनला पाहता येत नाहीत. त्यामुळे निकालाची गॅझेटेड प्रत आणि विद्यार्थ्यांची गुणपत्रिका महाविद्यालयांमध्ये तातडीने पाठवण्याचा प्रयत्न करू, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.