एल्फिन्स्टन दुर्घटनाप्रकरणी केवळ प्रसिद्धीसाठी याचिका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी या याचिका केल्याचे दिसते. खरोखर काळजी असती, तर एवढ्या जुन्या पुलाच्या समस्येबाबत त्यांनी यापूर्वीच न्यायालयात याचिका केली असती, अशा शब्दांत न्यायालयाने शुक्रवारी संबंधितांना खडसावले.

मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पूल 1967 मध्ये बांधण्यात आला. या स्थानकात झालेल्या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांबाबत काळजी व्यक्त करणारे याचिकाकर्ते न्यायालयात आले; मात्र दुर्घटनेपूर्वी याचिका करण्याची जाणीव त्यांना झाली नाही. या याचिका केवळ प्रसिद्धीसाठीच दाखल केल्याचे दिसते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

ठाण्यातील नागरिक विक्रांत तावडे, कॉंग्रेसच्या दक्षिण मुंबई विभागातील कार्यकर्त्या स्मिता ध्रुव यांनी या याचिका केल्या आहेत. स्थानकातील गर्दीच्या नियोजनाबाबत, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याच्या मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या आहेत. या मागण्या दुर्घटना घडण्याआधी करायला हव्या होत्या, असे न्यायालयाने म्हटले. या याचिकांवर पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.