पाण्याची गुणवत्ता दर्शवणारी यंत्रे लावा - कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

मुंबई - विविध प्रक्रिया केल्यानंतर पाण्याची गुणवत्ता कमी होत जाते. मुंबईसारख्या शहरात पाण्याच्या गुणवत्तेचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे; परंतु दोन वर्षांपासून ठिकठिकाणी पाण्याची गुणवत्ता दर्शवणारी यंत्रे लावण्याबाबत मुंबई महापालिका कमालीची उदासीन आहे, अशी खंत जलस्रोत नियामक प्राधिकरणाचे सचिव सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. "मुंबई आयएफटी 2017'च्या निमित्ताने वरळी येथे शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"मुंबई आयएफटी इंडिया 2017' प्रदर्शन 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या निमित्ताने कुलकर्णी म्हणाले, की राज्यातील शहरी भागांत जलप्रदूषणाचा मोठा प्रश्‍न आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा शहरात होताना दिसत नाही. नद्यांचे वाढते प्रदूषण, सांडपाण्याचा निचरा आदी प्रश्‍न शहरी भागांत आहेत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेला निधी कमी पडतो आहे. दोन वर्षांपूर्वी जलस्रोत नियामक प्राधिकरणाने सर्व पालिकांना पाण्याची गुणवत्ता दर्शवणारी यंत्रे लावण्याचे आदेश दिले होते. मुंबई महापालिकेने ती लावलेली नाहीत.

महापालिका उदासीन असली तरी नागरिकांनी याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. मुंबईत हवेची गुणवत्ता दर्शवणारी यंत्रे आता ठिकठिकाणी आहेत. त्या अर्थाने पाण्याची गुणवत्ता दर्शवणारी यंत्रेही लावण्यास हरकत नाही, असे कुलकर्णी म्हणाले.