पोलिस निरीक्षकाच्या पत्नीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुलगा बेपत्ता; वाकोला पोलिसात गुन्हा

मुलगा बेपत्ता; वाकोला पोलिसात गुन्हा
मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणाच्या तपास पथकातील पोलिस निरीक्षक जानेश्‍वर गणोरे यांची पत्नी दीपाली (वय 42) यांची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर त्यांचा मुलगा सिद्धांत (वय 21) बेपत्ता आहे. हत्येप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपासाकरिता पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत.

धडाकेबाज आणि अनेक क्‍लिष्ट गुन्ह्यांची उकल करणारे अधिकारी म्हणून गणोरे यांची ओळख आहे. शीना बोरा हत्याकांड तपासातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते पत्नी दीपाली आणि मुलगा सिद्धांसह सांताक्रूझमधील प्रभात कॉलनीत राहत होते. मंगळवारी (ता. 23) सकाळी गणोरे यांनी दीपाली यांना फोन करून नातेवाईक घरी येणार असल्याचे सांगितले होते. रात्री गणोरे घरी आले त्या वेळी त्यांनी दरवाजाची बेल वाजवली; मात्र खूप वेळ दरवाजा उघडला न गेल्याने पत्नी बाहेर गेली असावी, असे गणोरे यांना वाटले. रात्री अडीच वाजेपर्यंत ते पत्नीची वाट पाहत घराबाहेरच बसले होते. अखेर त्यांनी घराबाहेरील पायदानाजवळ ठेवलेल्या कपाटातून चावी काढली. घराचा दरवाजा उघडला त्या वेळी बेडरूममध्ये दीपाली थारोळ्यात पडल्या होत्या. हे पाहून गणोरे यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले. वाकोला पोलिस घटनास्थळी पोचले.
दीपाली यांना उपचाराकरिता व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. दीपाली यांच्या गळ्यावर चाकूने पाच-सात वेळा हल्ला केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांना हत्येकरिता वापरलेला चाकू आणि सिद्धांतचा मोबाईल घटनास्थळी सापडला. हत्येच्या घटनेनंतर सिद्धांत बेपत्ता आहे.