महाराष्ट्रातल्या इच्छुकांना आता प्रतीक्षा नवरात्रीची

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई - केंद्रातील बहुप्रतीक्षीत मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागल्याने आता महाराष्ट्रातील इच्छुकांच्या आशा पालवल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीकर श्रेष्ठी यांनाच याबद्दलची योग्य ती माहिती असल्याची प्रतिक्रिया इच्छुक व्यक्‍त करीत आहेत. गणेशोत्सवाचे दिवस आता जवळपास संपत आले आहेत. पितृपंधरवडा कोणताही चांगला निर्णय घेण्यास पसंत केला जात नाही. त्यामुळेच आता विस्तारासाठी नवरात्रीचा मुहूर्त असेल, अशी या इच्छुकांना आशा आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात परतण्याची लागलेली आस; प्रकाश महेता, सुभाष देसाई या ज्येष्ठ मंत्र्यांची सुरू असलेली चौकशी, तसेच केंद्राच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज झालेली शिवसेना या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात विस्तार केला जाणार नाही, अशी शक्‍यताही बोलून दाखवली जाते आहे.