प्रद्युम्न ठाकूर हत्याप्रकरणी अटकपूर्व जामीन नामंजूर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई - हरियानातील गुरगावमधील दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येच्या प्रकरणात रायन इंटरनॅशनल शाळेचे सीईओ रायन पिंटोसह तिघांनी केलेला अटकपूर्व ट्रान्झिट जामीन अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला. 

मुंबई - हरियानातील गुरगावमधील दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येच्या प्रकरणात रायन इंटरनॅशनल शाळेचे सीईओ रायन पिंटोसह तिघांनी केलेला अटकपूर्व ट्रान्झिट जामीन अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला. 

प्रद्युम्नची हत्या अत्यंत निघृर्णपणे झाली असून, पोलिसांनी स्कूल बसच्या चालकाला अटक केली आहे. रायन यांच्यासह त्यांचे आई-वडील व शाळेचे संस्थापक ऑगस्टीन पिंटो आणि ग्रेस यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायधीश अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी झाली. गुन्हा गंभीर असल्यामुळे अशाप्रकारे अर्ज मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पिंटो यांना पोलिस आयुक्त कार्यालयात पारपत्र जमा करायचे आहे. हरियाना उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यासाठी सशर्त अवधीही न्यायालयाने मंजूर केला आहे. यानुसार शुक्रवारी 5 वाजेपर्यंत ते हरियानामध्ये अर्ज दाखल करू शकतात. गुरुवारी पिंटो यांनी पोलिसांकडे पारपत्र जमा केले नाही, तर त्यांना दिलेला हा अवधी रद्द करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. राज्य सरकारच्या वतीने या अर्जाला विरोध करण्यात आला. अशा प्रकरणांमध्ये गुन्हा घडलेल्या राज्यातील सरकारला नोटीस देणे बंधनकारक आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. प्रद्युम्नचे वडील वरुण यांनीही ऍड. सुशील टेकडीवर यांच्यामार्फत न्यायालयात जामिनाला विरोध करणारा अर्ज केला होता. संस्थाचालक म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पिंटो यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर होता कामा नये, असा युक्तिवाद त्यांनी केला. विद्यार्थी संघटनेच्या वतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनीही अर्जाला विरोध केला होता.