आदर्श गैरव्यवहारप्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई - कुलाब्यामधील आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहाराबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधातील विशेष न्यायालयातील फौजदारी खटल्यावर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मनाई केली. यामुळे चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.

आदर्श सोसायटीला नियमांचे उल्लंघन करून परवानगी दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ठेवला आहे. त्यांच्यावर खटला चालविण्यासाठी विद्यमान राज्यपालांनी परवानगी दिली आहे. मात्र, यापूर्वीच्या राज्यपालांनी सन 2013 मध्ये दिलेल्या निर्णयात चव्हाण यांच्याविरोधात खटला चालविण्याइतपत पुरावे नसल्याचा शेरा दिला होता. त्यामुळे चव्हाण यांनी सीबीआयच्या निर्णयाला उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. आज न्यायाधीश रणजित मोरे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

खटल्याचा प्रारंभ विशेष न्यायालय 21 जूनपासून करणार आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली. यावर उच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी होईपर्यंत चव्हाण यांच्याविरोधात विशेष न्यायालयात सुनावणी घेऊ नये, असे निर्देश खंडपीठाने दिले. तसेच येत्या 21 जूनपासून उच्च न्यायालयात चव्हाण यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचेही खंडपीठाने निश्‍चित केले.