मालाडमध्ये ज्वेलर्स दुकानात 31 लाखांचा दरोडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई - मालाडमधे आंबेविक्री करणाऱ्या टोळक्‍याने त्यांच्या दुकानाला लागून असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकल्याचा प्रकार आज सकाळी घडला. दुकानाला भगदाड पाडून 31 लाखांचे दागिने चोरले. याप्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबई - मालाडमधे आंबेविक्री करणाऱ्या टोळक्‍याने त्यांच्या दुकानाला लागून असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकल्याचा प्रकार आज सकाळी घडला. दुकानाला भगदाड पाडून 31 लाखांचे दागिने चोरले. याप्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

आंबेविक्रीसाठी येणारे व्यापारी परराज्यातून मुंबईत येतात. ज्या भागात सोन्याची दुकाने अधिक आहेत अशाच ठिकाणी काही महिन्यांसाठी दुकानांचे गाळे भाड्याने घेतात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात चोरी करून पसार होतात, असे दुकानदाराने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सोमवारच्या दिवशी दुकाने बंद असल्याचा फायदा घेत रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे चोरी केली जाते. दरवर्षी एप्रिल महिन्यात पोलिस ज्वेलर्सना याबाबत सतर्कतेचा इशारा देत असतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मालाड पूर्वच्या राणी सती मार्गावर हे "सत्यम ज्वेलर्स' दुकान आहे. या दुकानाशेजारीच दोन महिन्यांपूर्वी आंबे व्यापाऱ्यांनी दुकान भाड्याने घेतल होते. आरोपींनी ज्वेलर्सच्या दुकानात भगदाड पाडले, गॅस कटरच्या साह्याने दुकानातील 31 लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले. सोमवारी (ता. 12) ज्वेलर्सचा मालक दुकानात आला तेव्हा दुकानाला पाडलेले भगदाड पाहून त्यांना धक्काच बसला.

दुकानदाराने दरोड्याची माहिती दिंडोशी पोलिसांना दिली. दिंडोशी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांना महत्त्वाचे सीसी टीव्ही फुटेज हाती लागले आहे. या गुन्ह्याच्या तपासाकरता तीन पथके तयार करण्यात आल्याचे दिंडोशी पोलिसांनी सांगितले. आंबे विक्रेत्याने दरोडा टाकून पळ काढल्याची ही यंदाच्या वर्षातील पहिलीच घटना आहे. दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.